चाळीमध्ये स्वस्त घरांचे आमिष दाखवून गरजूंना गंडा pudhari photo
ठाणे

Thane Crime : चाळीमध्ये स्वस्त घरांचे आमिष दाखवून गरजूंना गंडा

फसवणूक करणारे दोन चाळमाफिया मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : समाज माध्यमांवर आणि इंस्टाग्रामवर स्वस्त घरांचे अमिष दाखवत गरजूंना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या खोणी/धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनचे कथित बिल्डर वजा चाळमाफिया मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या दोघा यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. त्या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 19 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

डोंबिवली जवळच्या खोणी/धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनचे नाव धारण करून संरक्षण खात्याच्या जमिनीवर या दोघांनी तीन खोल्यांची चाळी बांधली. त्या चाळीतील खोल्यांची समाज माध्यमांवर आणि इंस्टाग्रामवर जाहिरातबाजी केली. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा भावात स्वस्तात घर दिले जाईल, असे अमिष या जाहिरातीच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, अशी जाहिरात पाहणाऱ्यांना आशा लागली होती. स्वस्त दरात घर मिळेल या अशाने शेकडो नागरिकांनी साई माऊली कन्स्ट्रक्शनचे कथित बिल्डर वजा चाळमाफिया मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे यांच्याकडे आपल्या आयुष्याची पूंजी सुपूर्द केली. कष्ट आणि घामाने पैसे मिळवून केलेले दाग-दागिने, बँक कर्ज, प्रॉव्हिडंट फंड, तसेच खासगी कंपन्यांकडून व्याजाने कर्ज घेऊन मिळालेले पैसे या दोघांना देऊन त्यांच्या चाळीतील घर बुक केले.

केवळ तीन रूम बांधलेल्या चाळीत तुम्हाला स्वस्तात घर देतो, असे अमिष दाखवत जवळपास 250 नागरिकांकडून 2 लाख, तर कुणाकडून 4 लाख रूपये टप्प्याटप्प्याने उकळून कोट्यवधींचा गंडा घातला. घराचा ताबा मिळविण्यासाठी शेकडो नागरिक ज्यावेळी या दुकलीकडे गेले तेव्हा त्यांनी आज/उद्या ताबा देतो, अशा थापा मारल्या.

कालांतराने चौकशी दरम्यान अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर डोंबिवलीत राहणाऱ्या अचल गुप्ता, मुंब्र्यात राहणाऱ्या राबिया इनामदार यांच्यासह फसगत झालेल्या शेकडो गरजूंनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

घटनेचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलिसांना गुन्हा दाखल दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शेकडो गरजूंना गंडा घालून पसार झालेल्या मनोज धुमाळ व सचिन सुर्वे या दोघांना अटक केली. गुरूवारी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

फसवणुकीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर

इंस्टाग्राम आणि समाज माध्यमांवर साई माऊली चाळ आणि जान्हवी प्रॉपर्टी या नावाने स्वस्त घरांच्या जाहिराती टाकून लोकांना आकर्षित करण्यात आले. अवघ्या 5 ते 7 लाखांत 1 बीएचके आणि 2 बीएचके फ्लॅट देण्याची अमिष दाखवून गरजूंकडून पैसे उकळले गेले. फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे, नकली रेरा सर्टिफिकेट आणि बनावट रसीदांचा वापर करण्यात आला.

लोकांकडून सुरुवातीला 1000 रूपये बुकिंग म्हणून घेतले गेले, त्यानंतर हप्त्याने मोठ्या रक्कमा उकळण्यात आल्या. जेव्हा लोक प्रत्यक्ष जागेवर गेले तेव्हा बिल्डर आणि प्रतिनिधी गायब असल्याचे आढळून आले. चौकशी दरम्यान त्यांनी बांधलेल्या चाळीखालची जमीन संरक्षण खात्याची असून तिथे बांधकाम पूर्णपणे बेकायदा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT