श्रद्धा शेवाळे
ठाणे : राज्यातील बदलती जीवनशैली, वाढती ताणतणावाची पातळी आणि पोस्ट-कोव्हिड दुष्परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण चिंताजनक वेगाने वाढत आहेत. लक्षणे सुरुवातीला सौम्य असल्याने नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गंभीर अवस्थेतच डॉक्टरांकडे धाव घेतात. त्यामुळे या दोन्ही आजारांचे प्रमाण आणि तीव्रता गेल्या काही वर्षांत अधिक प्रकर्षाने समोर येत आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मधुमेह व उच्च रक्तदाब या ‘सायलेंट किलर्स’ची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट नसतात. अधिक तहान लागणे, वारंवार लघवी, थकवा, चिडचिड, डोकेदुखी यांसारखी सामान्य लक्षणे अनेकदा ताणतणाव किंवा झोपेअभावी होत आहेत, असे समजून रुग्ण उपचार पुढे ढकलतात. मात्र, कोरोनानंतर या दोन्ही आजारांच्या तीव्रतेत वाढ दिसून येत असून, आनुवंशिकता व दीर्घकाळ घेतल्या जाणार्या औषधांचाही त्यावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
दीड कोटी नागरिकांची मधुमेह चाचणी
2025-26 मध्ये (30 ऑक्टोबरपर्यंत) राज्यात 1 कोटी 50 लाख 79 हजार 852 नागरिकांची मधुमेह चाचणी झाली. यातील 47 टक्के रुग्णांवर उपचार सुरू असून, 14.5 टक्के रुग्णांचा वैद्यकीय पाठपुरावा होत आहे. 2024-25 मध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे प्रमाण 37 टक्के होते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. उच्च रक्तदाबग्रस्तांची संख्याही सातत्याने वाढत आहे. 2025-26 मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) 51 लाख 57 हजार 429 रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील 15.9 टक्के रुग्ण फॉलोअपसाठी येत आहेत. 2024-25 मध्ये 41 लाख 28 हजार 952 रुग्णांपैकी 17.7 टक्के रुग्णांनी वैद्यकीय पाठपुरावा केला होता.
काय आहेत कारणे?
बदलती जीवनशैली व कमी शारीरिक श्रम
असंतुलित आहार, जंक फूडचे वाढते प्रमाण
सततचा ताणतणाव व अपुरी झोप
कौटुंबिक आनुवंशिकता
वजन वाढ आणि स्थूलता
दीर्घकाळ घेतली जाणारी काही औषधे
पोस्ट-कोव्हिड आरोग्य दुष्परिणाम
उपचार व फॉलोअपचे प्रमाण
मधुमेह : (2025-26)
एकूण तपासणी : 1,50,79,852
उपचार सुरू : 47 टक्के
फॉलोअप : 14.5 टक्के
उच्चरक्तदाब ः (2025-26)
नोंद : 51,57,429
फॉलोअप : 15.9 टक्के