ठाणे ः डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता नकली आखाड्यातून खर्या आखाड्यात आले आहेत. तुमच्या रूपाने सांगलीचा ढाण्या वाघ हा खर्या जंगलात आला असल्याचे कौतुक करीत, तुमच्या हाती कुस्तीची गदा होती, आता सत्तेची विजयाची गदा असेल, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले.
सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सातार्याचे पहिले हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्यासह अनेक पैलवान, शिवसैनिकांनी सोमवारी ठाण्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार सुहास बाबर, खासदार धैर्यशील माने, राम रेपाळे, शरद कणसे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगलीत स्थानिक स्वराज्य संस्थांत भगवा फडकविण्याचे आवाहन केले. यावेळी, वाघाची कातडी पांघरून लांडग्याला वाघ होता येत नाही, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. अनिल बाबर यांचे स्मरण करीत शिंदे यांनी, पैलवानांच्या अडचणी सोडवून पाटील यांच्याहाती सत्तेची गदा देणार असल्याचे सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, सांगलीत कुठेही एमआयडीसी हवी असल्यास ती सुरू करण्याचे आश्वासन देत, तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही, अशी ग्वाही दिली.
पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यास राजकारणातील घराणेशाहीची कीड लागली आहे. एका शेतकर्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती हे शत्रू म्हणून माझ्याविरोधात लढले. तरी 60 हजार मते एकट्याने घेतली. क्रीडा क्षेत्रातील प्रश्न मुख्यमंत्र्यांना भेटूनही सुटले नाहीत. म्हणून शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही ताकद दिली तर आताच्या 60 हजार मतांचे सहा लाख मतांमध्ये रूपांतर करून दाखवू.