ठाणे : नववर्षानिमित्त मध्य रेल्वेवर कल्याण, पनवेलसाठी न्यू इयर स्पेशल 4 विशेष लोकल धावणार आहेत. नवीन वर्ष आणि मुंबईतील समुद्र किनारे म्हणजे मुंबईतल्या व मुंबई बाहेरील नागरिकांसाठी खरच जुने व घनिष्ट संबंध मानले जाते. याच नव वर्षाच्या रात्रीची धामधूम अनुभवण्याकरिता मुंबई बाहेरच्या शहरांमधले नागरिक कुटुंबासह वर्ष अखेरीस रात्री मुंबईच्या दिशेने धाव घेत असतात.
या नागरिकांच्या सोयीखातर मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन उपाययोजना केली असल्याचे सूत्रांद्वारे सांगण्यात आले आहे. चालू वर्षाच्या अखेर रात्री मुंबईत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी व मुंबईतून नव वर्ष साजरी करून परतीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी 31 डिसेंबर रोजी 4 विशेष लोकल सेवा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रवाना करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत 2 विशेष लोकल रेल्वे सेवा तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांकरिता पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत 2 विशेष लोकल सेवा मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अलीकडील वर्ष अखेरचे दिवस आणि मुंबईत साजरा होणारे न्यू इयर म्हणजेच नव वर्षाचे मुंबईत होणारे आगमन उत्साहपूर्ण असते. दरवर्षी कल्याण, पनवेल, विरार, नालासोपारा, बदलापूर आणि इतर ठिकाणावरून बहुतांश नागरिक थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईत नवीन वर्षाचा उत्साह अनुभवायला येत असतात.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी 31 डिसेंबरच्या पूर्व संध्येला बहुतांश प्रवाशांची गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पाहायला मिळते. भरपूर प्रमाणात नागरिक वर्षाच्या अखेरीस मुंबईत प्रवास करतात; मात्र या अगोदर मुंबईत प्रवास करणाऱ्या नागरिकांना परतीच्या प्रवासासाठी कोणतीही लोकल सेवेची उपाययोजना व्यवस्थापित नसायची. प्रवाशांना इतर पहाटे डाऊनमार्गांवर प्रवास करणाऱ्या पहिल्या लोकलचे वाट पाहावी लागत असे; मात्र मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे बहुतांश प्रवाशांना नववर्षाच्या रात्री अप मार्गावरून डाऊन मार्गावर सुद्धा ऐन रात्रीच्या काळात सहजपणे प्रवास करता येणार आहे.
हार्बरवर दोन विशेष लोकल सेवा
मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे 31 डिसेंबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर प्रस्थान करणाऱ्या 2 विशेष लोकल सेवा रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रवाना करण्यात येतील. या लोकल सेवा रात्री 3 वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचतील व हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास करणाऱ्या 2 विशेष लोकल सेवांना देखील 1 आणि 2 ़फलाटांवरून 1 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास रवाना करण्यात येईल. या लोकल सेवा पनवेल रेल्वे स्थानकावर 3 वाजताच्या सुमारास पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने माध्यमांशी बोलताना जाहीर केली आहे.