Kalyan AC Local Train Technical Failure
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात एसी लोकलच्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी (दि.२२) सकाळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांची जलद एसी लोकल प्लॅटफॉर्मवर आली असता तिचे बहुतांश दरवाजे उघडलेच नाहीत. परिणामी एकाच दरवाजातून प्रवाशांना आत जावे लागल्याने स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
ऐन गर्दीच्या वेळी ही लोकल कल्याणला दाखल झाली. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ सुरू होती. मात्र लोकलचा केवळ एकच दरवाजा उघडल्याने हजारो प्रवासी त्या एकाच दरवाज्यावर जमा झाले. आत शिरण्यासाठी चढाओढ सुरू झाली आणि काही क्षणातच प्लॅटफॉर्मवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पावसामुळे आधीच विस्कळीत झालेल्या वाहतुकीत वेळेत कामावर पोहोचण्याची घाई असल्याने प्रवाशांची मोठी कसरत झाली.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे पाहून रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांनी लाठीचार्ज न करता समजावून गर्दीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांना रांगेत उभे करून एका-एकाला आत सोडण्यात आले. सुमारे दहा मिनिटांच्या गोंधळानंतर दरवाजा सुरक्षितपणे बंद करून लोकलला पुढे रवाना करण्यात आले.
या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या देखभाल आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रूपये खर्च करून सुरू केलेल्या एसी लोकलमध्ये जर दरवाजेच वेळेवर उघडत नसतील तर प्रवाशांच्या जीवाची हमी कोण देणार ? असा सवाल प्रवाशांनी केला आहे. सकाळच्या सुमारास अशी घटना घडल्याने अपघात होण्याची भिती होती. रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सर्व एसी रेकची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.