Center Railway  Pudhari News Network
ठाणे

Center Railway News : मध्य रेल्वेची झाली 1583 दशलक्ष प्रवासी संख्या

एकूण 492 स्थानके; मुंबईची जीवनवाहिनीचे 74 व्या वर्षात पदार्पण

पुढारी वृत्तसेवा

रोहे : मुंबईची जीवनवाहिनी असलेली मध्य रेल्वे शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असून जीआयपी रेल्वेचा उत्तराधिकारी असलेली मध्य रेल्वे आपल्या स्थापना दिनाची 73 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. बुधवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वे 74 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

आशियातील पहिली ट्रेन ही मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवारी 16 एप्रिल 1853 रोजी चालू झाली. 1900 मध्ये जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशा प्रकारे, मुंबईपासून भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला.

जीआयपीचे रेल्वे मार्ग मायलेज (मैल) 1,600 होती. (2575 किमी) 5 नोव्हेंबर 1951 रोजी, निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वेचे, ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वेसह एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये, मध्य रेल्वेचे 8 विभाग असलेले 5 विभागांचे पुनर्गठन करून आणखी सात झोन तयार करण्यात आले, ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या जबलपूर आणि भोपाळ विभागांचा पश्चिम मध्य रेल्वेमध्ये आणि झाशी विभागाचा समावेश उत्तर मध्य रेल्वेमध्ये करण्यात आला. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे 5 विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4,219 मार्ग किमीवर पसरलेले आहे आणि एकूण 492 स्थानके आहेत.

73 वर्षांतील कामगिरी

मध्य रेल्वेने गेल्या 73 वर्षांत अनेक कामगिरी केली त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरींपैकी पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस. मध्य रेल्वे विकासात सतत आघाडीवर आहे. मध्य रेल्वेवर निर्मितीच्या वेळी मूळ लोडिंग जी 16.58 मेट्रिक टन होती, ती आता 2023-24 मध्ये 89.24 दशलक्ष टन झाली आहे. जी मध्य रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वोत्तम लोडिंग आहे. 1951 मध्ये, मध्य रेल्वेने 224 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी 2023-24 या आर्थिक वर्षात 1583 दशलक्ष प्रवासी झाली.

वातानुकूलित उपनगरीय सेवा

मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार मार्गिका आहेत. 3 डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू 9 डब्यांच्या, 12 डब्यांच्या आणि 15 डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या मध्य रेल्वे 1850 उपनगरीय सेवा चालवते. याशिवाय नवीन रेल्वे लाईन निर्माण, दुहेरीकरण, तिसरी व चौथी लाईन, विद्युतीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT