Mobile emergency alerts pudhari photo
ठाणे

Mobile emergency alerts : मोबाईलवर अलर्ट पण मेसेज कुठे?

आपत्ती सूचनेनंतर एसएमएसची मागणी; अलर्टनंतर माहिती गायब; संभ्रम, अफवांना खतपाणी

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : पंकज साताळकर

राज्य व केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून भूकंप, अतिवृष्टी, चक्रीवादळ, Dजोरदार वारे आदी संभाव्य संकटांची पूर्वसूचना मोबाईलवर 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट'द्वारे दिली जात आहे. या अलर्टमुळे नागरिकांना तातडीने सतर्कता मिळत असली, तरी अलर्टनंतर त्याच माहितीचा साधा एसएमएस न मिळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या इशाऱ्याबाबत रायगडसह ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरातील नागरिकांच्या मोबाईलवर आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अलर्ट आला होता. अनेकांच्या मोबाईलवर हा पहिलाच 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' असल्याने काही नागरिक घाबरले, तर काहींनी घाईघाईत 'ओके' बटण दाबल्यामुळे संपूर्ण संदेश वाचलाच गेला नाही. परिणामी नेमका इशारा कशाबाबत आहे, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

सध्या अलर्ट बंद झाल्यानंतर त्याच माहितीचा एसएमएस मिळत नसल्याने नागरिकांना नंतर ती सूचना पुन्हा वाचता येत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दृष्टीदोष असलेले नागरिक किंवा घाबरलेल्या अवस्थेत संपूर्ण मजकूर वाचू न शकलेल्यांना याचा मोठा फटका बसतो. तसेच नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर किंवा गरज पडल्यास संबंधित संदेश कुटुंबीयांनाही पाठविणे शक्य होत नाही.

नागरिकांच्या मते, प्रत्येक 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट'नंतर त्याच माहितीचा स्पष्ट, सोप्या भाषेतील एसएमएस पाठविण्याची सुविधा राज्य व केंद्र सरकारने सुरू करावी. त्यामुळे अफवांना आळा बसेल, घबराट कमी होईल आणि आपत्तीच्या काळात अचूक माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल.

या छोट्या पण महत्त्वाच्या बदलामुळे आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था अधिक परिणामकारक होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन अलर्टनंतर एसएमएस पाठविण्याची यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT