डोंबिवली : सीबीएसई परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत डोंबिवलीतील राॅयल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी राजनंदिनी सावंत हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला आहे. राजनंदिनीच्या या उत्तुंग भरारीबद्दल भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी तिचे कौतुक केले.
राजनंदिनीच्या यशात तिच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा असल्याने कार्याध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांचेही कौतुक केले. याशिवाय राजनंदिनीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही या यशात मोलाचे योगदान असल्याने आमदार चव्हाण यांनी त्यांचाही शब्दसुमनांनी गौरव केला. डोंबिवली जशी साहित्यिक, सांस्कृतिक नगरी आहे तशी ती विद्यानगरीही आहे. इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकण्याची डोंबिवलीची जुनी परंपरा आहे. तिच परंपरा या शहरातील पालक, शिक्षक आणि शाळा चालकांच्या सहकार्याने राजनंदिनीसारखे गुणवंत विद्यार्थी पुढे चालू ठेवत आहेत. ही अखंडित परंपरा पुढे चालू ठेवणे हे खूप कौतुकास्पद आहे. राजनंदिनीच्या यशामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राजनंदिनीचा हाच यशाचा व गुणवंतपणाचा वारसा अन्य विद्यार्थी देखील पुढे नेतील आणि डोंबिवलीचे नाव उज्वल करतील, असा विश्वास आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. सखोल अभ्यास, कष्ट, जिद्द, चिकाटी, ध्येय आणि सातत्याच्या जोरावर राजनंदिनी सावंत हिने हे यश प्राप्त केले आहे. इतर विद्यार्थ्यांनीही हेच गुण प्राप्त करून आपली शैक्षणिक वाटचाल करावी, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले.