भिवंडीत अनधिकृत गोदामांवर बुलडोझर pudhari photo
ठाणे

Bhiwandi Warehouse Demolition: भिवंडीत अनधिकृत गोदामांवर बुलडोझर

सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील राजलक्ष्मी कंपाऊंड परिसरात असलेल्या अनधिकृत गोदामांवर मंगळवारी एमएमआरडीएने मोठी कारवाई सुरू केली आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जमीन मालक व गोदामधारकांना पूर्वसूचना आणि नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

जमीन मालक आणि गोदामधारक यांच्यात सुरू असलेल्या वादप्रकरणी न्यायालयात खटला प्रलंबित असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार एमएमआरडीएच्या पथकाने बुलडोझर आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई सुरू केली.कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कारवाईची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, व्यावसायिक व गोदामधारकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या गोदामांवर अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.दरम्यान एमएमआरडीएची ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता असून परिसरातील इतर अनधिकृत बांधकामांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT