डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीकडे कुंभारखापाडा परिसरात असलेल्या खंडोबा मंदिराजवळच्या गोठ्यातून पंढरपुरी जातीची दुधाळ म्हैस अज्ञात चोरट्यांनी दावे तोडून चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गोठ्याच्या मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चोरीस गेलेल्या म्हशीची किंमत 55 हजार रूपये इतकी आहे. विशेष म्हणजे गोठ्यात तक्रारदाराच्या आईसह मजूर झोपलेले असतानाही चोरट्यांनी म्हैस चोरून नेण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुंभारखाणपाडा भागात राहणाऱ्या आशीष दळवी यांच्याकडे गाई, म्हशी आणि बकऱ्या अशा दुधाळ प्राण्यांचे संगोपन केले जाते. तेथील खंडोबा मंदिरालगच्या कुलस्वामीनी संकुलाशेजारी दळवी यांचा गुरांचा गोठा आहे. गुरांपासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून ते कुटुंबीयांची उपजीविका करतात. मंगळवारी रात्री दोन वाजता गोठ्यातील गाई, म्हैस आणि शेळ्यांना त्यांची वैरण घालून त्यांना पाणी पाजले आणि ते पुन्हा आपल्या घरी गेले. गोठ्यामध्ये त्यांची वृध्द आईसह दोन मजूर झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात घुसून आशीष यांची वृध्द आई आणि मजुरांना चाहूल लागू न देता तेथील पंढरपूर जातीची दुधाळ म्हैस चोरून नेली. सकाळच्या वेळेत आशीष दळवी गोठ्याच्या साफसफाईसह गाई आणि म्हशीचे दूध काढण्यासाठी आले असता त्यांना पंढरपुरी जातीची म्हैस आढळून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेतला असता म्हैस आढळून आली नाही. अज्ञात चोरट्यांनी म्हैस चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत गोठा मालक आशीष दळवी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमार्फत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. म्हशीची चोरी कसायांनी केली असावी, असा कयास बांधला जात आहे. चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या, पादचाऱ्यांची लूट या सारख्या घटनांसह आता डोंबिवलीत पाळीव प्राण्यांच्याही चोऱ्या होऊ लागल्याने आणि त्याचे गुन्हे दाखल करावे लागत असल्याने पोलिसही चिंता व्यक्त करत आहेत.