ठाणे

Dombivli News : सुखी संसाराची स्वप्ने अधुरीच! होणाऱ्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर तरुणीनेही संपविले जीवन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील सोनारपाडा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भावी पतीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे एका १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोनारपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नाची लगबग अन् कोसळलेला दुःखाचा डोंगर

मिळालेल्या माहितीनुसार, सोनारपाडा येथील 'यशवंत ठाकूर कॉम्प्लेक्स'मध्ये राहणाऱ्या खुशी नाईक हिचा विवाह मिथुन नावाच्या तरुणासोबत ठरला होता. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला होता आणि येत्या काही दिवसांतच त्यांचा विवाह संपन्न होणार होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण होते आणि खुशीही आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत लग्नाच्या तयारीत व्यस्त होती.

मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अवघ्या १५ दिवसांपूर्वी खुशीचा भावी पती मिथुन याचा एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. संसार सुरू होण्यापूर्वीच तो मोडल्याने खुशी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. या मोठ्या आघातातून ती स्वतःला सावरू शकली नाही आणि अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले.

पोलिसांकडून तपास सुरू

मंगळवारी खुशीचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आला.

मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासानुसार भावी पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून ही आत्महत्या झाल्याचे समोर येत असले, तरी आत्महत्येमागील इतर संभाव्य बाबींचा आणि नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT