अंबाडी : भिवंडी तालुक्यातील चिंचवली घाडणे येथील एका वीटभट्टी मालकाने आगाऊ रक्कम (बयाना) दिल्याच्या वादातून एका कातकरी कुटुंबाला शिवीगाळ करीत, नजर कैदेत ठेेवून फिर्यादीची आई, बहीण व बहिणीच्या नवऱ्याला टेम्पोत जबरदस्तीने टाकून कामावर नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वेठबिगारीच्या गंभीर घटनेत अडकलेल्या पाच कातकरी आदिवासी मजुरांची श्रमजीवी संघटनेच्या तत्पर हस्तक्षेपामुळे यशस्वी सुटका करण्यात आली, तर संबंधित वीटभट्टी मालक पंढरीनाथ पाटील रा. चिंचवलीघाडणे, भिवंडी याच्याविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिलंझे गावातील पाच कातकरी मजुरांनी विटभट्टी मालक ाकडून पंधरा हजार रुपये रक्कम बयाना घेतला होता. मात्र त्या मजुरांनी त्याच्याकडे काम न करता रोजंदारीवर खारबाव येथील पंडित म्हात्रे यांच्या वीटभट्टीवर काम करण्यास सुरुवात केली.
ही बाब समजताच विटभट्टी मालकाने संतप्त होऊन फिर्यादीची आई, बहीण व बहिणीचा नवरा अनिकेत सवर यांना शिवीगाळ, धमकी देत जबरदस्तीने टेम्पोत कोंबून चिंचवलीघाडणे येथील आपल्या वीटभट्टीवर कामासाठी आणले.
या घटनेनंतर विटभट्टी मालकाच्या नजर कैदेतून सुटून फिर्यादी रवींद्र काळुराम पवार (वय 22, रा. चिंचपाडा) हा पत्नी व लहान मुलीसोबत भीतीपोटी थेट श्रमजीवी संघटनेच्या कार्यालयात पोहोचला व संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
हा गंभीर प्रकार श्रमजीवी संघटनेच्या निदर्शनास येताच संघटनेच्या कार्याध्यक्षा आराध्या पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी शहर तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप चौधरी, उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव, महेंद्र निरगुडा, तालुका सचिव तानाजी लहांगे, सचिन कुंभार, गुरुनाथ वाघे, नीता घरत, रामदास निरगुडा आदी कार्यकर्त्यांनी तातडीने भिवंडी तालुका पोलीस ठाणे गाठले.पीडित मजुरांना धीर देण्यात आला व त्यांची सविस्तर तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली.
अधिक तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम तसेच बंधमजुरी वेठबिगार प्रतिबंधक कायदा 1976 मधील कलमानुसार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे करीत आहेत.