डोंबिवली (ठाणे) : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यात असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभागातील ठाकूर पाड्यात राहणाऱ्या रहिवाशांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत ये-जा करण्याकरिता सोयीचा रस्ता नव्हता.
स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थ्यांना चिखल तुडवत, तसेच ओढ्यातील गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करत शाळा आणि पुन्हा घर गाठावे लागत असल्याचे विदारक दृश्य दैनिक पुढारीने 'स्मार्ट सिटीतील शाळेत जायला रस्ता नाही : ठाकूर पाड्यातील पालकांसह विद्यार्थ्यांचा केडीएमसी प्रशासनाला सवाल' या मथळ्याखाली सचित्र वृत्त मंगळवारी २४ जूनच्या अंकात प्रसारित केले होते. या वृत्ताने खडबडून जाग्या झालेल्या केडीएमसीने मंगळवारी दुपारपासून ठाकूर पाड्यातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांसाठी रस्त्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
स्मार्ट सिटीचा कांगावा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील टिटवाळ्याजवळच्या ठाकूर पाड्याची अवस्था अतिदुर्गम भागासारखी झाल्याचे विदारक अनुभव या भागातील रहिवाशांसह विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. स्मार्ट सिटी असलेल्या महापालिकेच्या शाळेत जाण्यासाठी ठाकूर पाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता धड नसल्याचे चिखल तुडवत आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढत ये-जा करावी लागते. हा गंभीर प्रकार दैनिक पुढारीने सचित्र वृत्ताद्वारे चव्हाट्यावर आणल्यानंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. चिखलमय रस्त्याच्या बांधकामासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या. मंगळवारीच दुपारच्या सुमारास या रस्त्यावर खडी टाकण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. येत्या दोन दिवसांत संपूर्ण रस्ता सुस्थितीत करून देणार असल्याचे केडीएमसीच्या अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले. तर सहाय्यक अभियंता ओमकार भोईर यांनी येत्या दोन दिवसांत संपूर्ण रस्त्याचे वॉटर बाऊंड मॅकाडम (WBM) करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
गेल्या तीन आयुक्तांच्या कार्यकाळात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता. मात्र दैनिक पुढारीने शालेय विद्यार्थ्यांना होणार त्रास सचित्र वृत्ताद्वारे सविस्तरपणे विशद केल्याने त्याची केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्याचे बांधकाम दर्जेदार करण्याचे फर्मान आयुक्तांनी सोडल्यानंतर लागलीच कामाला सुरूवात झाल्याचे सांगत ठाकूर पाड्यातील दिनेश लोभी, प्रवीण लोभी, सुदाम लोभी, चंद्रकांत लोभी, कविता शिंदे, सुमन लोभी, आदी ग्रामस्थांनी दैनिक पुढारीचे आभार मानले.
वॉटर बाऊंड मॅकाडम (WBM) पध्दतीने रस्त्यांचे बांधकाम दर्जेदार ठरते. पाण्यात मिसळलेल्या दगडी तुकड्या, स्क्रीनिंग आणि बंधनकारक साहित्याचा वापर करून रस्ते बांधण्यासाठी साहित्य, बांधकाम पद्धती आणि मानकांची रूपरेषा देतात. मुख्य पैलूंमध्ये एकत्रित निवड, श्रेणीकरण, थर जाडी आणि कॉम्पॅक्शन तंत्र यांचा समावेश आहे. WBM रस्ते त्यांच्या तुलनेने कमी प्रारंभिक खर्चासाठी ओळखले जातात. परंतु त्यांना अधिक देखभालीची आवश्यकता असते. इतर फुटपाथ प्रकारांच्या तुलनेत त्यांचे आयुष्य कमी असते.