कल्याण : पुढारी वृत्तसेवा
घटना मृत्यूनंतरही दफनासाठी जागा मिळत नसल्याने एका महिलेच्या मृतदेहाची तब्बल दहा तास परवड झाल्याची संतापजनक कल्याणजवळील मोहने परिसरात घडली. वसीमुनिसा काझी यांच्या मृतदेहावर दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आल्याने संतप्त नातेवाइकांनी थेट कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांचा बंगला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडविल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर दहा तासांनी टेकडी कब्रस्थान येथे दफनविधी पार पडला. या घटनेने कल्याणमधील मुस्लिम दफनभूमीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वसीमुनिसा काझी यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह मोहनेजवळील दफनभूमीत नेला. मात्र, तेथे दफनविधीस नकार देण्यात आला. त्यानंतर नातेवाइकांनी उल्हासनगर महापालिका हद्दीतील दफनभूमीत मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे हद्दीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्थान येथे आणला. तिथेही दफनविधीस नकार मिळाल्याने नातेवाइकांचा संयम सुटला. तीन ठिकाणी नकार मिळाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह थेट महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर नेण्याचा निर्णय घेतला.
दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरता असल्याचा निषेध नोंदविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याची माहिती मिळताचा काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागेसाठी मुस्लिम समाजाला वारंवार संघर्ष करावा लागत आहे.
मृतदेहाची अशी परवड आता तरी थांबली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलनाची भूमिका मागे घेतली. त्यानंतर टेकडी कब्रस्थान येथे काझी यांच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला. मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नावर येत्या १६ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दफनभूमींची जागा अपुरी
मुस्लिम समाजातील दोन पंथांनुसार मृत व्यक्तींच्या दफनविधीसाठी वेगवेगळ्या दफनभूमींची व्यवस्था आहे. याशिवाय कल्याणमधील मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये काही खासगी दफनभूमीही आहेत. मात्र, त्या खासगी मालकीच्या असल्याने सर्वांना तेथे दफनविधी करता येत नाही. त्यातच एकदा मृतदेह दफन केल्यानंतर त्याच जागेवर लगेच पुन्हा खड्डा खोदणे शक्य नसते. त्यामुळे उपलब्ध दफनभूमींवरील ताण वाढत असून जागा अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही कुटुंबीयांना दारोदारी भटकावे लागत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.