भाईंदर : भाईंदर येथील भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात लवकरच रक्तपेढी सुरु होणार असून त्यानुषंगाने काम सुरु असल्याचे रुग्णालय सुत्राकडून सांगण्यात आले. यामुळे शहरातील रुग्णांना त्याचा फायदा होणार असला तरी या रक्तपेढीतून सुरुवातीला केवळ रुग्णालयातील रुग्णांनाच रक्त पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे बाह्य रुग्णांना ये रक्तपेढीतून रक्तपुरवठा होण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पालिकेने २०१२ मध्ये मीरारोड येथे माजी आ. मुझफ्फर हुसैन यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात भारतरत्न स्व. राजीव गांधी रक्तपेढी सुरु केली. हि रक्तपेढी पालिकेने एका खाजगी संस्थेला चालविण्यासाठी दिली असून पालिकेने त्यातील रक्त पुरवठ्यासह लाल रक्त पेशी (एरीथ्रोसाइट्स), पांढऱ्या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स), प्लाझ्मा, को- ईम्युलेशन व बिंबिका (प्लेटलेट्स) चा दर तत्कालीन महासभेच्या मान्यतेने निश्चित केला आहे.
हा दर सर्वसामान्यांना परवडेल इतका कमी प्रमाणात निश्चित करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. यामुळे हि शहरातील माफक दरातील एकमेव रक्तपेढी ठरल्याने अनेकदा त्यात रक्तगटाच्या आवश्यकतेप्रमाणे रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रक्तपेढीतून जास्त दराने रक्त खरेदी करावे लागते. रुग्णांना किमान तातडीचा रक्तपुरवठा व्हावा, यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आल्यानंतर शासनाने जोशी रुग्णालयात रक्तपेढी सुरु करण्यास मान्यता दिली.
शासनाने जोशी रुग्णालयात रक्तपेढी सुरु करण्यास मान्यता दिली असून त्याअनुषंगाने रक्तपेढीच्या युनिटचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर रक्तपेढीचे तांत्रिक काम पूर्ण करून ती सुरु करण्याकरीता एफडीए (अन्न व औषध प्रशासन) कडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. एफडीएची परवानगी मिळताच रक्तपेढी सुरु केली जाणार असून त्यात सुरुवातीला केवळ रक्त साठा केला जाणार आहे. – डॉ. जाफर तडवी, जोशी रुग्णालय अधिक्षक
जोशी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्यासाठी काही दिवसांपूर्वी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पार पडलेल्या चर्चेनुसार सुरुवातीला रक्तसाठा करणारी रक्तपेढी सुरु करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्याला नुकतीच मान्यता मिळाल्याने अद्यावत स्वरुपाची रक्तपेढी तयार करण्यात त्यातून येत आहे.
-गिता जैन, आमदार