ठळक मुद्दे
लाडका भाऊ वाऱ्यावर ; बेरोजगार तरुणांची उपमुख्यमंत्री शिंदे विरोधात काळी दिवाळी
लाडका भाऊ योजनेंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा
११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हाताला अद्याप काम मिळालेले नाही
ठाणे : राज्यातील १० लाख तरुण तरुणींना लाडका भाऊ योजनेंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र घोषणा करूनही सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही. याविरोधात रविवारी (दि.19) बेरोजगार तरुणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काळी दिवाळी साजरी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा... मामाच्या गावाला जाऊया... कायमस्वरूपी रोजगार मिळवू या... अशा घोषणा सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील १० लाख तरुण तरुणींना लाडका भाऊ योजनेंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली होती. आता मात्र या तरुणांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून हे तरुण आता पुन्हा बेरोजगार झाले आहेत. गेल्या ४ महिन्यापासून त्यांना मानधनाची फुटकी कवडीही मिळाली नसल्याने हजारो बेरोजगार आज पुन्हा ठाण्यात धडकले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हजारो युवकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही.
१० लाख युवकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. मात्र, १३ आंदोलने करूनही तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थीच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार ह्या, मानधनात दुप्पट वाढ करा तसेच, कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा करा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत ११ महिने काम केल्यानंतर बेरोजगार झालेल्या शेकडो युवांनी आठवडाभरापूर्वी ठाण्यात आंदोलन करून सरकारला जाब विचारला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या चर्चाचे काय झाले असा सवाल तरुणांनी उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनेची घोषणा केली. त्यानंतर तरुण तरुणांची मते घेतली.. आता या मुलांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारने केले आहे. एकनाथ मामाने तर आपल्या भाचा-भाचींना फसवले असल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने केला आहे.
ठोस आश्वासन हवे अन्यथा आंदोलन तीव्र
सरकारला प्रशिक्षणार्थीचा विसर पडला असून अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत. तसेच, सरकारच्या या कृती विरोधात संतप्त झालेल्या शेकडो आंदोलकांनी काळी वस्त्रे परिधान करून आज पुन्हा ठाण्यात रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. ठोस आश्वासन हवे नाहीतरी येत्या काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील यांनी दिला आहे.