डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपाने सुरुंग लावला आहे. डोंबिवलीचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही सारी किमया साधली आहे. शिंदे सेनेचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक महेश पाटील हे आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल झाले आहेत. त्यांनी आपल्या सहकारी असलेल्या दोघा माजी नगरसेवकांनाही भाजपात आणले आहे. हे तिघेही पूर्वी भाजपासाठी काम करत होते. त्यामुळे त्यांची भाजपात घर वापसी झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय उपथपालथ सुरू झाली आहे. गेली पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. या घटनेला काही तासांतच कलाटणी मिळाली. शिंदे गटाच्या तीन नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
यात माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील. माजी नगरसेवक महेश पाटील आणि माजी नगरसेविका सायली विचारे यांचा समावेश आहे. यातील महेश पाटील हे शिंदे सेनेत कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख होते. ते रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. तर भाजपाच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनीही घरवापसी केली आहे. अजून काही माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या मनःस्थितीत आहेत.
मंगळवारी सकाळी पश्चिम डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेत सध्या आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेची गळती अद्यापही थांबली नसल्याचे चित्र दिसत आहे.
हे प्रवेश ठरले वादाचे कारण...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपमधून शिवसेनेत आलेले विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या प्रवेशावेळचे चित्र. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश झाला. हे दोन्ही प्रवेश वादाचे कारण ठरले. दीपेश म्हात्रे यांचा 9 नोव्हेंबर रोजी सकाळी भाजपात प्रवेश झाला. म्हात्रे यांचा प्रवेश रविवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
महापौर महायुतीचाच होणार : चव्हाण
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खिंडार पाडायला घेतले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचे सुतोवाच रविंद्र चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यामुळे महायुतीत फूट पडली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.