भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अनपेक्षित यश संपादीत करून स्पष्ट बहुमत मिळविले. तर प्रभाग क्रमांक 14 मधील भाजप बंडखोर तथा अपक्ष उमेदवार अनिल भोसले यांनी विजय प्राप्त केला. काँग्रेसच्या हाताने मागील 12 जागांमध्ये यंदाच्या निवडणुकीत 1 जागेवर विजय मिळवून एकूण 13 जागांवर विजय प्राप्त केला. तर शिंदे शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला असला तरी उत्तनमधील प्रभाग क्रमांक 24 मधील 2 व भाईंदर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 11 मधील महिला उमेदवारांनी विजय प्राप्त करून सेनेला तारले.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेसोबत युती नाकारून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तर सेनेने भाजपच्या सहकार्याने विजय संपादन करण्याचा उद्देश मनाशी बाळगून भाजप सोबत युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. सेनेच्या या उद्देशाला लाथाडून भाजपने सेनेला स्वबळावर लढवून विजय प्राप्त करण्याचे एकप्रकारे आव्हान दिले.
भाजपच्या या हेकेखोरीला उत्तर देण्यासाठी सेनेने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्थानिक नेतृत्व व युतीला नकार देणारे आ. नरेंद्र मेहता यांच्या पूर्वीच्या भानगडी चव्हाट्यावर आणण्यास सुरुवात केली. यात सेनेला शहरातील विकासाचा मुद्दा घेण्यास सवड मिळाली नाही आणि शेवटच्या टप्प्यात शिवसेनेने विकासाच्या मुद्द्याला पुढे करीत मेहता यांना भस्मासुराची उपाधी देण्यात वेळ घालविला.
याउलट मेहता यांनी सेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर देत लोकांकडे भावनिक साद घालण्यास सुरुवात केली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर संकल्प सभा मेहता यांच्यासाठी आधारवढ ठरली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सेनेच्या जाहीर स्वप्नांच्या शहराच्या सभेत शिंदे यांनी विशेष भाष्य न करता केवळ धनुष्यबाणावरच शिक्का मारण्याचे आवाहन मतदारांना केले. त्याचा विशेष प्रभाव सेनेच्या मतदारांवर पडला नाही आणि निकालाच्या माध्यमातून ते खरे ठरले.
दरम्यान सेनेत भाजपने उमेदवारी नाकारलेली मंडळी दाखल होऊ लागल्याने सेनेचा प्रभाव वाढत होता. तसेच सेनेने काँग्रेसला छुपा पाठिंबा दिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरू लागली होती. त्यावर मेहता यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी थेट प्रसार माध्यमांशी संवाद साधून प्रत्येक प्रभागातील त्रुटींचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्या त्रुटी त्यांनी वेळेत कमी करण्याचा सपाटा लावला आणि स्व-पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करण्याची रणनिती आखण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना यश आल्याचे जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले.
15 जानेवारी रोजीच्या मतदानादिवशी एकूण 8 लाख 19 हजार 151 मतदारांपैकी एकूण 3 लाख 98 हजार 445 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून एकूण 48.64 टक्के मतदान केले. त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी, 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यात भाजपला प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 12, 13, 15, 16, 17, 18, 20, 21 व 23 मधील सर्व चारही जागा आणि प्रभाग क्रमांक 11 व 14 मध्ये प्रत्येकी 3 जागा अशा एकूण 78 जागांवर विजय मिळून स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. तर काँग्रेसने मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9, 19 व 22 मध्ये संपादीत केलेल्या एकूण 12 जागांपैकी यंदाच्या निवडणुकीत उत्तनमधील प्रभाग क्रमांक 24 मधील एका जागेवर विजय प्राप्त केला. यामुळे काँग्रेसच्या हाताने 1 जागेत वाढ करून एकूण 13 जागांवर विजय संपादन केला. तर शिवसेनेने उत्तनमधीलच प्रभाग क्रमांक 24 मध्ये दोन जागांवर विजय मिळवून आपले खाते उघडले.
या प्रभागाने सेनेला तारले असतानाच प्रभाग क्रमांक 11 मध्ये सेनेला एकाच जागेवर विजय संपादन करता आला. गतवेळच्या निवडणुकीत एकसंध सेनेला (यावेळी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे शिवसेनेत एकत्र होते) 22 जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदाच्या निवडणुकीत तब्बल 19 जागांवर शिंदे सेनेला पराभव पत्करावा लागला. यामुळे सेनेत अस्वस्थता पसरली असतानाच त्यावर चिंतन करण्यासाठी पराभूत उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात गर्दी केली होती.
भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी निवडणुकीतच जाहीर केलेल्या अब कि बार सत्तर पार चा नारा देत हा जादुई आकडा पार यश संपादीत केले. त्याचा जल्लोष भाजपच्या प्रत्येक विजयी प्रभागांमध्ये करण्यात आला. तर काँग्रेसने सेनेच्या पाठिंब्यावर अपेक्षेपेक्षा 1 जागा जास्त मिळवित यश संपादीत केल्याचा आनंद साजरा केला. तर सेनेच्या अनपेक्षित प्रभावाचा शिंदे व सरनाईक यांना मोठा धक्का मानला जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदानावेळी प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मतदारांनी आपले मत नेमके कोणाला दिले त्याची स्पष्टता होऊ शकली नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे वृत्त दैनिक पुढारीने 16 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यावरून भाजपला स्पष्ट बहुमत मिळून तब्बल 78 जागा मिळाल्याचा प्रत्यय निकालानंतर आल्याची चर्चा सेनेच्या गोटात सुरु झाली होती. तर सेनेने प्रतिष्ठेचे केलेल्या प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार पूजा आमगावकर यांचा पराभव झाल्यानंतर त्याचा धक्का सहन न झाल्याने त्याचा रक्तदाब खालावल्याने त्यांना चक्कर येऊन त्या खाली कोसळल्याची घटना घडली. त्यांना तात्काळ लगतच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.