ठाणे : “बिग बॉस सीझन -3” चा विजेता, ठाण्यातील रहिवासी आणि जिम व्यावसायिक जय दुधानेला परदेशात कुटुंबासह जाताना मुंबई विमानतळावरून ठाणे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात 5 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा 28 ऑगस्ट,2025 रोजी तक्रारदार प्रशांत महादेवराव पाटील (61) यांच्या तक्रारीनुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला. जय दुधानेला रविवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
तक्रारदार प्रशांत महादेवराव पाटील (61) रा. ठाणे हे शासकीय सेवेतून निवृत्त आहेत. त्यांना व्यावसायिक गाळे खरेदी करायचे होते. मार्च 2024 मध्ये प्रॉपर्टी एजंट सुरेश झुलाल चव्हाण यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांनी अनिल दुधाने यांच्याकडे पाच गाळे टियारा कमर्शियल कॉम्प्लेक्स, गांधीनगर, माजीवाडा, पोखरण रोड नंबर 2 ठाणे पश्चिम याठिकाणी विक्रीसाठी असल्याचे सांगितले.
त्यानुसार पाच गाळे घेण्याचे ठरले. तक्रारदाराने अनिल दुधाने व जय दुधाने यांची भेट घेतली. पाच गाळ्यांची किंमत 4 कोटी 90 लाख रुपये ठरले. पाच लाखांची टोकन रक्कम देण्यात आली. टायटल क्लीअर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनिल दुधाने यांचे निधन झाले. या व्यवहारात जय दुधाने यांचा समावेश झाला. त्यावेळी मालमत्तेचे टायटल क्लीअर असल्याचे समोर आले. एक्सिस बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून कर्ज भरण्यासाठी आणि कमी पडणारे पैसे वेळोवेळी घेतले.
असे एकूण 4 कोटी 61 लाख 2 हजार रुपयांची रक्कम घेतली, मात्र बँकेचे कर्ज परत केले नाही. मात्र गाळ्यांचा ताबा देण्यात आला. त्यानंतर कर्ज न भरल्यानंतर बँकेने जप्ती आणली. त्यामुळे जय दुधाने यांनी 5 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनघा दुधाने, जय दुधाने, प्रांजल दुधाने, आशा दुधाने आणि मोतीराम दुधाने यांच्या विरोधात 28 ऑगस्ट, 2025 रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर गुन्ह्याच्या तपासानंतर शनिवारी जय दुधाने हे परिवारासह परदेशात जात असतानाच मुंबईच्या विमानतळावर पोलिसांनी अटक केली. अधिक तपास वर्तकनगर पोलीस करीत आहेत.