भिवंडी : सुमित घरत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी - वाडा मार्गावर दरवर्षीप्रमाणे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यांमुळे अपघात होऊन गेल्या बारा वर्षांत 600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. केवळ तीन वर्षात 75 नागरिकांचा अपघातात मृत्यू झाल्याने या गंभीर घटनेला जबाबदार ठेकेदारासमोर मात्र शासकीय यंत्रणा हतबल झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी केला आहे.
विशेष म्हणजे गेल्या 12 वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केली आहेत. भिवंडी ते वाडा हा 40 कि.मी. अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून प्रत्येक पावसात हा मार्ग खड्डेमय होताना दिसतो. त्यावर थातूरमातूर डागडुजी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती होते. सध्या भिवंडी-वाडा-मनोर रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे.
64 किमी रस्त्यावर मोठे खड्डे असून, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तब्बल 801 कोटींचा निधी कंपनीला दिला आहे. तर 80 कोटी या मार्गावर काँक्रीट पॅच मारण्यासाठी मंजूर केले आहेत. त्यानंतरही कामांचा दर्जा आणि गती अत्यंत संथ असून, नागरिकांच्या जीवाला रोज धोका निर्माण झाला आहे.
उग्र आंदोलन छेडणार
भिवंडी तालुका व वाडा तालुका परिसरातील गणेशाच्या मूर्ती याच भिवंडी-वाडा-मनोर मार्गावरून नागरिक घरी घेऊन जातात. आता खड्ड्यामुळे नागरिकांनाच वाहनातून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे गणेशोत्सवात श्री गणेशाच्या मूर्ती घेऊन जाण्यापूर्वी तरी हा रस्ता खड्डेमुक्त करा, अशी मागणी होत असून उग्र अंदोलन छेडणार असल्याचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी सांगितले आहे.
निष्पाप लोकांचे संसार उघड्यावर
या मार्गावर बारा वर्षात अपघातात 600 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आजही निष्पाप लोकांचे जीव जात असून संसार उघड्यावर पडत आहेत.प्रशासन आता जागृत झाले. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे.