भटके श्वान file photo
ठाणे

Bhiwandi Municipality News | भिवंडीत भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर

Bhiwandi Stray Dog : भटक्या श्वानांच्या प्रश्नावर निर्बीजीकरणासाठी मनपा नेमणार ठेकेदार

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : जुलै महिन्यातील 6 ते 8 तारखेदरम्यान कामतघर,शांतीनगर आणि शहरातील इतर भागात मिळून भटक्या श्वानांनी 135 नागरिक व मुलांना चावा घेतला होता. केवळ शांतीनगरमधील भागात पिसाळलेल्या कुत्र्याने 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना चावा घेतला होता. या घटनेमुळे शहरातील श्वानांच्या नसबंदीचा विषय ऐरणीवर आला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने श्वानांच्या नसबंदीसाठी लागणार्‍या व्यवस्थेची तयारी केली असून लवकरच श्वानांच्या निर्बीजीकरणाची निविदा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

भिवंडी महापालिकेने गेल्या 12 वर्षांपासून श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे भिवंडीत भटक्या श्वानांची संख्या वाढली असून शहरातील रस्ते आणि गल्ल्या भटक्या श्वानांचे आखाडे बनले आहे. रस्त्यांवरून जाणारे नागरिक अथवा वाहने यांच्या अंगावर श्वान धावून अथवा त्यांचा पाठलाग करून त्यांना चावण्यांचे प्रकार दैनंदिन जीवनात घडत असून एका महिन्यात सुमारे 886 जणांना भटके श्वान चावल्याची नोंद शहरातील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी पंधारे यांनी दिली.भिवंडी मनपा आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार 2012 पूर्वी श्वान पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी संस्थांची व ठेकेदाराची नेमणूक केली होती. त्यासाठी स्थानिक कांबा गावातील डम्पिंग ग्राऊंडमध्ये नसबंदी केंद्र सुरू करण्यात आले होते.महापालिकेच्या माहितीनुसार 2008 ते 2012 या कालावधीत संस्थेने 38 हजार 868 श्वानांची नसबंदी केली होती.त्यासाठी मनपाने पाच वर्षांत 2 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून मनपाने श्वान नसबंदी आणि पकडणे पूर्णपणे बंद केले आहे.

भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाकडे 485 रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहेत, त्यापैकी 15 रेबीज लसीचा वापर आरोग्य केंद्रात (ईदगाह केंद्र) करण्यात आला आहे. उर्वरित इंजेक्शन महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध आहेत.श्वान चावल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन रेबीजचे इंजेक्शन घ्यावे.तसेच शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण केली असून लवकरच त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अजय वैद्य, भिवंडी महापालिका आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT