भिवंडी: तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या भिवंडी महानगर पालिका स्थायी समिती सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला असून येत्या बुधवारी (15) रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडी पालिका स्थायी समिती साठी 16 सदस्य निवड होणार असून त्यामध्ये पक्षीय बलाबल लक्षात घेता काँग्रेस 5,भाजपा 4, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) 2, शिवसेना 2, समाजवादी पार्टी, कोणार्क विकास आघाडी व भिवंडी विकास आघाडी प्रत्येकी 1 असे सदस्य असणार आहेत.
त्यासोबत या महासभेत विषय पत्रिकेवर 5 प्रभाग समितीं च्या प्रभागांचे सीमांकन जाहीर करणे व महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाच्या पालिकेस सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या करारास मुदतवाढ देण्याचा विषय चर्चिला जाणार आहे.
स्थायी समिती मधील संख्याबळ पाहता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) यांच्या सेक्युलर फ्रंट कडे अवघे 7 चे संख्याबळ होत असून स्थायी समिती सभापती पदाच्या बहुमतासाठी 9 सदस्य संख्या लागणारा आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये नव्या राजकीय समीकरण पाहायला मिळते का पुन्हा भाजपा बंडखोरी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
तर काँग्रेस सदस्य कोण बनणार हे सर्वस्वी समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या हाती असून त्यांच्या समर्थकांची वर्णी सदस्यपदी लागू शकते. तर सेक्युलर फ्रंट मधील सत्तेच्या वाटेकरी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) यांच्या वाट्याला सभापती पद जाणार आहे. परंतु त्यांच्याकडून बहुमताचा आकडा कसा गाठला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.