Bhiwandi Municipal Corporation Pudhari
ठाणे

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडी महापालिकेत सत्तासंघर्ष तीव्र; 25 दिवसांनंतरही महापौर निवडणूक रखडली

कोणार्क विकास आघाडी ‘किंगमेकर’ ठरणार? भाजप–काँग्रेस–शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय रस्सीखेच

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : संजय भोईर

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांवर मागील साडेतीन ते पाच वर्षांपर्यंत कालावधी प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे महानगर पालिका निवडणुकीची सर्वांनाच ओढ लागली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील महानगर पालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्या निकालानंतर सर्वच पालिकांच्या महापौर पदांच्या निवडणुका सुद्धा संपन्न झाल्या. पण 25 दिवसानंतर ही महापौर पदाची निवडणूक न जाहीर होणारीभिवंडी महानगरपालिका याला अपवाद ठरली आहे.

भिवंडी महानगरपालिकेचा समावेश ड वर्ग मध्ये आहे.असं असताना सुद्धा भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक कोकण विभागीय आयुक्तांकडून अजूनपर्यंत जाहीर केली जात नाही आणि त्यामुळेच भिवंडी महानगरपालिका काही वेगळी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर व वसई-विरार अशा महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकांसह राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या. परंतु भिवंडी पालिकेतील सत्ता स्थापनेतील गणित जुळवून घेण्यात अडसर ठरत असल्याने येथील निवडणुका अजून ही रखडलेल्या राहिल्याने पालिकेत निवडून आलेले सर्व नगरसेवक वेगवेगळ्या कंपू सोबत बाहेर अज्ञातस्थळी निघून गेल्याने शहरात फक्त महापौर निवडीच्या चर्चांचे गुऱ्हाळ नाक्या नाक्यावर नागरिकांमध्ये सुरू आहेत.

पण सत्ता स्थापनेत काँग्रेस व भाजपच्या प्रयत्नांमध्ये समाजवादी पक्ष, कोणार्क विकास आघाडी व भिवंडी विकास आघाडी यांच्या 13 सदस्यांना महत्व प्राप्त झाले आहे. यांचा कल ज्या दिशेने राहील सत्तेचे गणित त्या दिशेने सरकणार असल्याने यांचे समाधान जो करेल, त्यांना सत्ते प्राप्त होईल एवढे मात्र नक्की. भिवंडी पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भिवंडी राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी यांच्या मदतीने भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्ष सुद्धा इच्छुक झाला आहे. मात्र प्रभावी चेहरा नसल्यामुळे काँग्रेस अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्ष अशी सुद्धा बोलणी करीत आहे. त्यामुळे आता आगामी काळात भिवंडी महापालिकेत कोणाची सत्ता बसते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणार्क विकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

भारतीय जनता पक्षाला एक मात्र अपक्ष नगरसेवक पाठिंबा देईल आपली अशी अपेक्षा असतानाच नगरसेवक नितेश ऐनकर यांनी अनपेक्षितपणे कोणार्क विकास आघाडीला पाठिंबा देत भाजपाला जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे आता कोणार्क विकास आघाडी कोणासोबत आघाडी करणारा याकडे लक्ष लागले आहेत. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्रिशंकू असलेल्या महानगरपालिकेत सत्ताधारी म्हणून भाजप पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी इच्छुक झालेला आहे. मात्र या पक्षाला शिवसेनेकडून अद्याप कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नसल्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार नारायण चौधरी व ज्येष्ठ नगरसेवक सुमित पाटील यांची आता धावपळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT