भिवंडी (ठाणे) : शहर विकासासाठी शहरात प्रशस्त रस्ते असणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्ते रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील अंजूरफाटा ते कल्याण रोड स्व. राजीव गांधी चौक व तेथून टेमघर या मार्गावर रस्ते रुंदीकरण प्रस्तावित आहे. भिवंडी विकास आराखड्यात दोन्ही मार्गिक वर सुमारे सहा मीटर रस्ते रुंदीकरण केले जात आहे. महानगरपालिके तर्फे अंजूरफाटा ते कल्याण नाका या मार्गिकवर सोमवार (१७) पासून रस्ते रुंदीकरण कामास सुरवात होत असून बाधित नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मागील कित्येक वर्षांपासून शहरातील रस्ता रुंदीकरण झाले नव्हते. त्यामुळे अरुंद रस्त्यांमुळे शहराला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले होते. तर रेल्वे नसलेल्या शहरात मेट्रो धावण्याचे स्वप्न रस्ते रुंदीकरण होत नसल्याने रखडलेले आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या नव्या विकास आराखड्यात मुख्य रस्त्यावर रुंदीकरण दर्शविले होते.
हे रस्ते रुंदीकरण करण्यासाठी आयुक्त अनमोल सागर यांनी कणखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सर्व शासकीय सोपस्कर पूर्ण करीत या मार्गांवर बाधित रस्त्यावरील मालमत्तांना चिन्हांकित करण्यात येऊन बाधित मालमत्तांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोमवारी अंजूरफाटा ते कल्याण नाका दरम्यान प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये ३४७ व प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये ३३ मालमत्ता बाधित होत असून त्यांना एक महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे. तर आता २४ तासांमधील कारवाई करण्यासंदर्भात अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. यासाठी मोठा पोलिस फौजफाटा या कारवाई दरम्यान असणार आहे.
बाधितांना वाढीव चटई क्षेत्र - प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ
रस्ते रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांना वेळेवर पंचनामा करून वाढीव चटई क्षेत्र तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभमिळणार आहे. तर लवकरच होणाऱ्या जनगणने नंतर शहराची लोकसंख्या वाढल्याने त्यानंतर शहरात निर्माण होणाऱ्या गृह संकुलात बाधितांना निवास अथवा वाणिज्य जागा उपलब्ध करून देता येणार असल्याने या रुंदीकरणास बाधितांनी भविष्यातील होणाऱ्या शहर विकास कार्यात हातभार लावण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.