भिवंडी : भिवंडी शहरानजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मीठ पाडा येथील शत्रुंजय या धाग्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीत मंगळवारी दुपारी भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.
या कंपनीमध्ये तिसऱ्या मजल्यावर ही आग लागण्याची घटना घडली. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कच्चा धागा रंग प्रक्रिया करण्यासाठी साठवण्यात आलेला होता. जो या आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी घडलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर चार तासांनी ही आग आटोक्यात आली आहे.
दरम्यान आगीचे कारण अजून अस्पष्ट असून स्थानिक भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस या दुर्घटनेची चौकशी करीत आहेत.