भिवंडी: शहरातील नारपोली गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर इमारतीचा उर्वरित धोकादायक भाग पाडण्यास येथील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान आधी आमचे पुनर्वसन करा या मागणीवर रहिवासी ठाम आहेत.
भिवंडी शहरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाकडून या इमारतीचा उर्वरित भाग पाडण्यास रविवारी सुरुवात करण्यात येणार होती.
परंतु स्थानिक नागरिकांनी या कारवाईस कडाडून विरोध करीत या पाडकामास विरोध दर्शवला. कोहिनूर अपार्टमेंट या इमारतीमध्ये ४८ फ्लॅट असून यामधील बी विंगचा संपूर्ण भाग कोसळून दुर्घटना झाल्यानंतर पालिकेकडून या इमारतीचा उर्वरित ए विंगचा भाग सुद्धा काढून टाकण्यासाठी घटनास्थळी पोकलेनसह कर्मचारी दाखल झाले.
नागरिकांनी या कारवाईस विरोध करून आमच्या फ्लॅट्समधील मौल्यवान साहित्य कागदपत्र हे आम्हाला प्रथम काढून द्यावेत त्यानंतर उर्वरित भाग पाडावा, अशी मागणी केली. तर पालिकेने ही कारवाई करण्याआधी आम्हाला या मालमत्ते संदर्भात पंचनामा करून द्यावा तसेच संबंधित बिल्डरने आम्हाला पुन्हा इमारत उभी करून द्यावी, याबाबत ठोस आश्वासन द्यावे तेव्हाच उर्वरित बांधकाम पाडावे, अशी मागणी केली आहे.
पालिकेने दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या इमारतीलासुद्धा धोका असल्याचे दिसून आल्यानंतर तेथील नागरिकांनासुद्धा तत्काळ इमारत रिकामी करून स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करावी, अशा आदेशानंतर या इमारतीमधील अनेकांनी आपले साहित्य हलवण्यास सुरुवात केली आहे.
तात्पुरती कारवाई थांबवली...
नागरिकांच्या या विरोधानंतर प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी तात्पुरत्या स्वरूपात कारवाई थांबवली असून उद्या पुन्हा नागरिकांची चर्चा करून कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे.
बाधितांना विश्वासात घ्यावे : यशवंत टावरे
पालिकेने या ठिकाणी कारवाई करत असताना दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील बाधित व शेजारी इमारतीमधील रहिवासी असा सर्वांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक यशवंत टावरे यांनी दिली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही अत्यंत कमकुवत तसेच भुसा वापरून बनवण्यात आली होती.
तर ए विंगवरील छतावर मोबाईल टॉवर बसवण्यात आला होता. कारवाई करताना पालिका व पोलीस प्रशासनांना कोणालाही पाठीशी न घालता कठोर शासन करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच या बाधितांना तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारीसुद्धा पालिकेची असल्याचे यशवंत टावरे यांनी व्यक्त सांगितले.
आयुक्त, सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी
भिवंडीतील नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथील कोहिनूर इमारत गुरुवारी रात्री कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान १० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भिवंडी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता तथा नगरसेवक खालिद गुड्डू यांनी दावा केला की, ही नैसर्गिक दुर्घटना नसून प्रशासकीय निष्काळजीपणा आणि गंभीर हलगर्जीपणाचा परिणाम आहे.
त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी तक्रार पाठवून पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले, आयुक्तांनी १८ जून रोजी शहरातील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या तातडीने रिकाम्या करण्याचे लेखी आदेश दिले होते. आदेशांची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते हा निष्काळजीपणा नसून गंभीर अपयशाची बाब आहे. त्यांनी आयुक्तांसह शहर अभियंता, प्रभाग अधिकारी, संबंधित प्रभाग अभियंता तसेच बीट निरीक्षक यांनाही तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले, नागरिकांमध्ये या घटनेबाबत प्रचंड रोष आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर नागरिक शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरतील. हा इशारा नसून जनभावनेचे वास्तव चित्र आहे. त्यांनी २१ सप्टेंबर २०२० रोजी नारपोलीतील पटेल कंपाऊंड येथील इमारत कोसळून ३८ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आठवण करून दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाने सूमोटो पीआयएल क्रमांक १/२०२० दाखल केला होता, जो अद्याप प्रलंबित आहे. इतक्या वर्षांनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.