Bhiwandi Building Collapse Pudhari
ठाणे

Bhiwandi Building Collapse: भिवंडीत भीषण दुर्घटना! 'कोहिनूर' इमारतीचा भाग कोसळला; 3 मजुरांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

Bhiwandi Building Collapse: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे 'सी-श्रेणी'तील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या कोहिनूर इमारतीचा एक भाग कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Bhiwandi Building Collapse: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंडमधील चार मजली 'कोहिनूर' इमारतीचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याने किमान तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, आणखी काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

जर्जर इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती

भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत महापालिकेने यापूर्वीच 'सी-श्रेणी' (C-Category) म्हणजेच अतिधोकादायक आणि जीर्ण घोषित केली होती. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांना आधीच सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. मात्र, इमारतीच्या तळमजल्यावर काही मजूर काम करत असताना हा भीषण अपघात झाला.

तीन खांब एकाचवेळी तोडल्याने दुर्घटनेची शक्यता

प्राथमिक माहितीनुसार, इमारतीचे तीन खांब एकाचवेळी तोडण्यात आल्याने संपूर्ण संरचनेचा तोल बिघडला आणि बी-विंगचा मोठा भाग पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. या घटनेमुळे काम करणारे मजूर ढिगाऱ्याखाली अडकले.

NDRF चे तातडीने बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच NDRF, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि विशेष कटरच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये देवजी नगर येथील 32 वर्षीय शमीम शेख यांचा समावेश असून, इतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लहान मुलीची सुखरूप सुटका

बचाव पथकाने आतापर्यंत तीन जणांना सुखरूप बाहेर काढले, त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडली तेव्हा तिचे आई-वडील बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र ती स्वतः ढिगाऱ्याखाली अडकली होती. बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर तिची सुरक्षित सुटका केली.

अनेक मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली असल्याची भीती

अधिकारी आणि बचाव पथकांच्या मते, ढिगाऱ्याखाली अजूनही काही मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT