भिवंडी : पत्नीला कर्करोगासारखा गंभीर आजार जडलेला असतानाच पतीने हुंड्यासाठी पत्नीच्या घरी जावून जंतर मंतर करीत जादूटोणा केल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीतील निजामपूरा पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. याप्रकरणी पती योगेशकुमार केशरवानी, सासरा ओमकारनाथ केशरवानी, सासू चंद्रावती कैशरवानी, नणंद भावना मल्होत्रा,अनुराधा अरोरा,श्रद्धा बोबडे (सर्व रा.डोंबिवली) अशा सहा जणांविरोधात जादूटोणा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित 36 वर्षीय महिला भिवंडीतील निजामपूरा पोलीस ठाणे हद्दीत राहत असून तिचा विवाह डोंबिवली तील योगेशकुमार याच्याशी सन 2015 मध्ये झाला आहे. दरम्यान, पीडिता रुग्णालयात कर्करोगाशी चौथ्या टप्प्यात झुंज देत असतानाच पतीसह सासरच्यांनी सन 2015 पासून तिचा हुंड्यासाठी छळ केला. तेव्हापासून प्रत्येक अमावस्येला ती अपशकुनी असल्याचे गृहीत धरून पीडिता सासरी नांदत असताना घरात काळ्या जादूची पूजा मांडून पत्नीला शारीरिक, मानसिक त्रास दिला जात असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हंटले आहे.
त्यातच सप्टेंबर 2025 मध्ये पीडितेला कर्करोग जडल्याचे समजले. त्यानंतर आरोपी पतीने पीडितेच्या लहान बहिणीला पीडितेच्या सासरी डोंबिवली येथे घरकामासाठी बोलावून तिलाही राबवून घेतल्याचा आरोप पीडितेच्या लहान बहिणीने केला आहे. तसेच आरोपी पतीने घरच्या मंडळीने संगनमताने पत्नीला 7 डिसेंबर रोजी मुलासह घरातून हाकलून दिल्याचे पीडितेने सांगितले आहे.
तसेच पीडितेवर दवा उपचार न करता उलट पीडितेच्या मुलासह बहिणीला मारहाण केली आहे. यासह पती योगेशकुमार केशरवानी ह्याने 22 जानेवारी 2026 च्या रोजी पुन्हा पीडिता राहत असलेल्या भिवंडीतील घराच्या दरवाज्या समोर कुंकू, कापलेले लिंबू व काळ्या बाहुल्या टाकून आपल्याला जीवे ठार मारण्यासाठी हा जादूटोण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक खुलासा पीडित पत्नीने केला आहे.