मोबदला न देताच तानसा धरणातून पाईपलाईन टाकण्याचा घाट pudhari photo
ठाणे

Tansa dam pipeline project : मोबदला न देताच तानसा धरणातून पाईपलाईन टाकण्याचा घाट

बाधित शेतकरी न्यायालयात दाद मागणार

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न देताच तानसा धरणातून पाईपलाईन टाकण्याचा घाट घातला जात आहे. तानसा धरणातून नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी अघई ते ताडाळी या 45 किमी लांबीच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न देताच नवीन तानसा पाईपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे परिसरातील 20 ते 22 एकर शेतीतील तब्बल 150 बाधित शेतकऱ्यांनी याविरोधात संताप व्यक्त केला असून याबाबत दाभाड पाली येथील श्रमिक शक्ती संघटनेचे अध्यक्ष देविदास पाटील यांनी मुंबई महापालिकेने भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊ न नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण करावे अथवा कामाला तत्काळ स्थगिती द्यावी, नाहीतर याबाबत स्थानिक बाधित शेतकऱ्यांसोबत न्यायालयात जाऊन दाद मागू, असा इशारा देविदास पाटील यांनी एका अर्जाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिला आहे.

याची प्रत संबंधित विभागांना दिली आहे. त्यानुसार ब्रिटीश काळात 1925 व त्यानंतर स्वतंत्र काळातही जमिनीचे भूसंपादन न करताच पाईप लाईन टाकून बाधित शेतकऱ्यांना मोबदला न देताच शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

श्रमिक शक्ती संघटनेने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी 2011 पासून संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करून तसेच उपोषण करूनही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याचे नमूद केले आहे. त्यावेळी बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून पालिका प्रशासनात नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, शेतकरी कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशा मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या.

कामाला तत्काळ स्थगिती द्यावी

देविदास पाटील यांनी सद्यस्थितीतील सरकारने कलम 2023 चे उल्लंघन केल्याचे म्हटले असून त्यांनी शासनाने कलम 11 नुसार अधिसूचना काढावी तसेच कलम 19 नुसार नवीन प्रकल्प घोषित करावे. कलम 38 नुसार ताबा घेण्यापूर्वी मोबदला द्यावा, असे सुचवले असून सुरू असलेल्या पाईप लाईनच्या कामाला तत्काळ स्थगिती देण्यास सांगितले असून तसे न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठी कायद्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT