भिवंडी : भिवंडीत एका वृद्ध महिलेला दागिने चोरीच्या उद्देशाने ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही वृद्ध महिला घरात एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील ३५ वर्षीय महिलेने दागिने चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेच्या घरात शिरून तिला बेदम मारहाण केली. तसेच तिला रक्तबंबाळ करून तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील लोनाड येथील देवरुंग पाड्यात घडली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध पडघा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, आरोपी महिला आणि जखमी महिला या दोघीही एकाच गावात राहतात. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वृद्ध महिला घरात एकटी असताना त्यांच्या ओळखीतील असलेली आरोपी महिला रेकी करून दागिने चोरीच्या उद्देशाने घरात शिरली. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत तिने वृद्धेला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिला रक्तबंबाळ झाल्या.
यावेळी आरोपी महिलेने वृद्धेकडे कपाटाच्या चाव्या मागितल्या. तसेच तिचा गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
दरम्यान, झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध महिलेने आरडाओरड करत कसातरी घराचा दरवाजा उघडून स्वतःची सुटका करून घेतली. दरम्यान, हा गुन्हा दखलपात्र असतानाही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप वृद्ध महिलेने केला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, पोलिसांनी दखलपात्र गुन्हा असतानाही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच आरोपी महिलेने तक्रारदार वृद्ध महिलेच्या घरात दागिने चोरीच्या उद्देशाने शिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी महिलेविरुद्ध गंभीर दखलपात्र गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जखमी तक्रारदार महिलेने केली आहे.