भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे धारदार शस्त्रांनी वार करत दोघाजणांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात 12 हल्लेखोरांविरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. प्रफुल्ल तांगडी, (42) आणि तेजस तांगडी (22) अशी हत्या झालेल्या युवकांची नावे असून मृतक प्रफुल्ल हे भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
सदर हत्याकांडाबद्दल भिवंडी तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी हे भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावातील रहिवाशी असून दोघेही चुलत भाऊ आहेत. मृतक प्रफुल्ल याचे याच गावात मुख्य रस्त्यावर कार्यालय आहे. याच कार्यालयातून दोघेही सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असतानाच धारधार शस्त्र हातात असलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी अचानक दोघांवर सपासप अनेक वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.
वर्षभरापूर्वीही झाला होता प्राणघातक हल्ला
खळबळजनक बाब म्हणजे एक वर्षापूर्वीही भाजपचे युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी सुदैवाने या हल्ल्यात प्रफुल्ल बचावले होते. तर दुसरीकडे मृतक प्रफुल्ल यांचा रियल इस्टेस्टचा व्यवसाय होता. याच व्यावसायिक वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आरोपी अटक झाल्यानंतरच या दुहेरी हत्येचे खरे कारण समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.