Bhiwandi fire Incident Pudhari
ठाणे

Bhiwandi fire Incident: भिवंडीत लक्ष्मीपूजनानंतर रात्रभरात 12 आगीच्या घटना; आगीत लाखो रुपयांचे नुकसान

पाच मोठ्या दुर्घटनांमध्ये सात दुकाने जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

संजय भोईर

भिवंडी: दिवाळीमध्ये उडणाऱ्या फटाक्यांमुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या दुर्घटना घडत असतानाच भिवंडी शहरात दिवाळीत रविवारी लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री फटाके फोडल्या नंतर अग्निशामक दलाला १२ ठिकाणी आगी लागल्याच्या वर्दी आल्या आहेत.

काही ठिकाणी फटाक्यांमुळे, दिव्यामुळे तर कोठे शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या या आगी लागल्या आहेत. यामध्ये पाच ठिकाणी लागलेल्या आगी मोठ्या होत्या.

ज्यामध्ये वेगवगेळ्या ठिकाणच्या सात दुकाने जळून खाक झाली आहेत. तर एक चाळ जाळून खाक झाली आहे. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास काप आळी या ठिकाणी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगी मध्ये तब्बल सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये कुलर विक्रेता, एलईडी डेकोरेशन लाईट विक्रेता, गालीच्या विक्रेता, चप्पल दुकान व होजियरी कपड्यांचे दुकान हे जळून खाक झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली त्यांचे प्रयत्न तोकडे पडल्यानंतर या ठिकाणी अजून दोन गाड्या दाखल झाल्यानंतर अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी दोन तासात ही आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत या ठिकाणी सहा दुकानांमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

रविवारी दिवाळीसणामध्ये लक्ष्मीपूजन सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. त्यानंतर ठीक ठिकाणी घरी, दुकानात दिवे लावून पूजन केले जाते.

कामतघर गणेशनगर येथे बॅग विक्री दुकानात रात्री पूजन केल्यानंतर दिवे लावण्यात आले होते. अशाच एका दिव्यामुळे दुकानात आग लागली. जी आग झटकन पसरल्याने या आगीत दुकानातील विक्री साठी असलेल्या सर्व बॅग साहित्य जळून खाक झाले आहे.

या आगीची माहिती अग्निशामक दलाला उशिरा मिळाल्याने ते पोहचे पर्यंत स्थानिकांनी आग आटोक्यात आणली होती. त्यानंतर अग्निशामक दलाने आग पूर्ण विझविली आहे.दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर फुटलेल्या फटाक्यांमुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्याचे समोर येत आहे.

भिवंडी शहरातील कामतघर ओसवालवाडी या परिसरात फटाका उडून लागलेल्या आगीत लाकडी बॅट बनवणारा कारखाना जळून खाक झाला आहे. ही आग एवढी भयंकर होती की, या आगीत कारखान्यांमधील संपूर्ण यंत्रसामुग्री व लाकडी साहित्य जळून खाक झाले आहे. या कारखान्याशेजारीच मंडप डेकोरेशन साहित्य साठवण्याचे गोदाम असल्याने त्या ठिकाणी सुद्धा आगीच्या झळा पोहचल्या होत्या.

गौरीपाडा येथील आगीत घर जाळून खाक

रविवारी रात्री दहा साडेदहा वाजता च्या सुमारास गौरीपाडा या परिसरात तळ अधिक एक मजली चाळ असलेल्या इमारती लगत असलेल्या भंगार गोदामात सुरुवातीला आग लागली. त्यानंतर आग झपाट्याने वाढत गेल्यानंतर पहिल्या मजल्या वरील घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे या आगीमध्ये या चाळीतील पाच खोल्या जळून खाक झाल्या आहेत.

सुदैवानं यापैकी तीन घरे रिकामी होती तर दोन घरातील कुटुंबीयांना ही आग लागताक्षणी स्थानिकांनी बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आगीचे कारण अजून समोर आलेले नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाची वाहन दाखल होत त्यांनी या आगीवर तीन तासांनी नियंत्रण मिळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT