ठाणे

लागोपाठ तीन इंजेक्शन दिल्याने भिवंडीत चिमुकलीचा मृत्यू

दिनेश चोरगे

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  शहरात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीचा चुकीचे उपचार केल्यामुळे निधन झाले आहे. चिमुरडीच्या मृत्यूस डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय व्यवस्थापक जबाबदार धरत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. इंजेक्शनचे तीन डोस लागोपाठ दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झालाय, अशा आरोप नातेवाईकांनी केला.

शहरातील भंडारी कंपाऊंड येथे सनलाईट हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी नजीकच्या साठे नगर परिसरात राहणारे नितीन कांबळे यांची साडेतीन वर्षीय मुलगी श्रद्धा हिस उलट्या होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास श्रद्धा हीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाला सलाईनमधून परिचारिकेने एकामागोमाग एक तीन इंजेक्शन दिली. त्यानंतर श्रद्धा बेशुद्ध पडून निपचित झाली त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे कळताच रुग्णालयात असलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी आकांड तांडव सुरू केला. त्यानंतर तेथे जमा झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करीत डॉक्टर परिचारिका यांना मारहाण केली. माझ्या मुलीची तब्येत सायंकाळपर्यंत चांगली होती. त्यानंतर चुकीच्या उपचाराने माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नितीन कांबळे यांनी केला.

परस्पर विरोधात गुन्हे

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली व त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर भोईवाडा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून योग्य तपास करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT