ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील दिवे-अंजूर गावाजवळ नाशिक महामार्गावर १०० मीटर लांबीचा आणि १,४०५ मेट्रिक टन वजनाचा अजस्र स्टीलचा पूल यशस्वीरीत्या उभारण्यात (लॉन्च) आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत पूर्ण करण्यात आलेला हा पहिलाच स्टील पूल ठरला आहे. या संपूर्ण कॉरिडॉरमध्ये एकूण २८ स्टीलचे पूल प्रस्तावित असून, त्यापैकी १६ पुलांचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
या पुलाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, याचे मूळ बांधकाम प्रत्यक्ष घटनास्थळापासून सुमारे १,३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या तामिळनाडूतील त्रिची येथील कार्यशाळेत (वर्कशॉप) करण्यात आले. तेथून हे महाकाय स्टीलचे भाग विशेष ट्रेलर्सच्या साहाय्याने महाराष्ट्रात आणले गेले आणि घटनास्थळी त्यांची जोडणी (असेंब्ली) करून पूल उभारण्यात आला. जटिल आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मिती व पुरवठ्यामध्ये भारताची वाढती स्वदेशी क्षमता अधोरेखित करणारा हा प्रकल्प ठरला आहे.
पुलाच्या निर्मितीमध्ये डिझाइन, ड्रॉइंग आणि निर्धारित तांत्रिक मानकांनुसार अत्यंत अचूक कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग व पेंटिंगची कामे पार पाडण्यात आली. स्टीलच्या प्रत्येक बॅचची 'अल्ट्रासोनिक टेस्टिंग' करण्यात आली असून, यासाठी काम करणाऱ्या वेल्डर आणि सुपरवायझर यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात आले होते. हा प्रकल्प हाय-स्पीड रेल्वे विकासातील 'मेक इन इंडिया'चा आदर्श नमुना मानला जात आहे.
पुलाचा टिकाऊपणा आणि कंपन नियंत्रण क्षमता वाढवण्यासाठी 'सी-५ प्रोटेक्टिव्ह पेंटिंग सिस्टम' आणि 'इलॅस्टोमेरिक बेअरिंग्ज'ची व्यवस्था करण्यात आली आहे. पुलाची जोडणी पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन हॉलो जॅक्स आणि प्री-टेन्शन्ड 'मॅकॅलॉय बार्स'च्या साहाय्याने ऑटोमॅटिक मेकॅनिझमद्वारे पुलाला निर्धारित जागी सरकवून बसवण्यात आले. महामार्गावरील वाहतुकीला कमीत कमी अडथळा व्हावा यासाठी हे काम रात्रीच्या 'ट्रॅफिक ब्लॉक'दरम्यान अत्यंत नियोजनबद्धरीत्या करण्यात आले. जिथे लांब स्पॅनची गरज असते, अशा महामार्ग, एक्स्प्रेस-वे आणि नद्यांवर हे स्टीलचे पूल अत्यंत उपयुक्त ठरतात.
लांबी : १०० मीटर
वजन : १,४०५ मेट्रिक टन
उंची : १४ मीटर
रुंदी : १४ मीटर