भिवंडी : येथे कोसळलेल्‍या इमारतीमध्‍ये सुरू असलेले शोधकार्य.  
ठाणे

Bhiwandi Building Collapse | भिवंडीत इमारत कोसळून १० जणांचा मृत्‍यू; ४ गंभीर

शासनाकडून मृतांच्‍या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : गुरुवारी मध्‍यरात्री भिवंडी महापालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी येथे ‘कोहिनूर अपार्टमेंट’ नावाची चार मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली सापडून १० जणांचा मृत्यू झाला. तर, चारजण गंभीर जखमी आहेत. ‘एनडीआरएफ’च्या जवांनानी मदत कार्य करून चौघा जखमींना आणि १० जणांचे मृतदेह बाहेर काढले.

दुरुस्‍ती काम सुरू असणाऱ्या या इमारतीतून सुरुवातीला गुरुवारी रात्री ११.३० वाजता कडकडाट करणारा आवाज आला. त्‍यावेळी इमारतीला तडे गेले, त्‍यामुळे नागरिकांना बाहेर काढण्‍याचे काम सुरू असतानाच इमारत कोसळल्याने १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाकडून मृतांच्‍या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्‍यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

भिवंडी महानगर पालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी येथील ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही चार मजली अतिधोकादायक ठरवलेली अवघे १३ वर्षे वयोमान असलेली इमारत गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेअकरा वाजण्‍याच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष, अग्‍निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून आले; परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्यानंतर दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’, ‘टीडीआरएफ’, अग्‍निशमन दल यांनी बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली.

दुर्घटनेतीलमृतांची नावे : क्रिश कुमार (वय २५), रणजित सिंग (४५), राधेश्याम कुशवाह (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष पांडे (४२), शमीम अन्सारी (३०), राकेश पासवान (४५), मुकेश पासवान (३५), अशोक पासवान (५०)

जखमींची नावे : अभय यादव (वय २६), दीपक यादव (२५), संगीता प्रजापती (३६)

कंत्राटदारावर फौजदारी : मुख्यमंत्री

मुंबई : या इमारतीचे काम सुरू ठेवणार्‍या कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT