भाईंदर (ठाणे) : मौजे घोडबंदर गाव येथील आदिवासींची ७ हजार ५४० चौरस मीटर जागा मेसर्स शांती कॉन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार दिलीप वोरा यांनी मयत वारसदारांना हयात दाखवून बनावट पॉवर ऑफ ऍटर्नीद्वारे जमीन परस्पर नावावर करून जागा मालकांची फसवणूक केल्याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात वोरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे घोडबंदर गाव येथील सर्वे क्रमांक ७१ हिस्सा क्रमांक २ व सर्वे क्रमांक ७२ हिस्सा क्रमांक १ वरील ७ हजार ५४० चौरस मीटर जमीन वासंती रघुनाथ पाटील, दिपक चंद्रकांत पाटील, जयप्रकाश चंद्रकांत पाटील, रंजन चंद्रकांत पाटील यांच्या नावे आहे. या जमीन मालकांनी ५ मार्च १९८८ रोजी मेसर्स शांती कन्ट्रक्शनचे भागीदार दिलीप मनीलाल वोरा, नलिन जगमादास तेजुरा यांना ऍग्रीमेन्ट फॉर सेल कम डेव्हलपमेन्ट करीता दिली होती. त्याचा व्यवहार ७ लाख रुपयांना झाला होता. १ सप्टेंबर १९८९ रोजी जमीन मालकांनी बिल्डरसोबत सप्लीमेन्ट्री ऍग्रीमेन्ट करीत त्यात एकूण व्यवहारातील ३ लाख ५० हजार रुपये शिल्लक असल्याचे नमुद करण्यात आले. मात्र व्यवहाराची कागदपत्रे कोणत्याही प्रकारे नोटराईज अथवा नोंदणीकृत करण्यात आलेली नव्हती.
ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे मेसर्स शांती कन्ट्रक्शनचे भागीदार यांनी पुर्ण रक्कम जमीन मालकांना न दिल्याने १५ डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी मेसर्स शांती कन्ट्रक्शनचे भागीदारांना कायदेशीर नोटीस बजाविली. बिल्डरांनी नोटीसीला कोणतेही उत्तर न दिल्याने पुन्हा २२ फेब्रुवारी १९९० रोजी नोटीस बजाविण्यात आली. यानंतरही बिल्डरांनी नोटिसीला कोणतेही उत्तर तसेच ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जमीन मालकांना रक्कम न दिल्याने ९ मार्च १९९० रोजी जमीन मालकांनी १९८८ मध्ये केलेला करारनामा तसेच १९८९ मध्ये केलेले सप्लीमेन्ट्री ऍग्रीमेन्ट रद्द करीत हि बाब वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. यानंतर तब्बल ४ वर्षानंतर दिलीप वोरा यांनी जमीन मालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता १९८८ व १९८९ मध्ये केलेला करारनामा व पूरक करारनाम्याचा वापर करून त्या जागेचे दस्तावेज परस्पर नोंदणीकृत केले. त्याची कोणतीही कल्पना जागा मालकांना नसल्याने २०१३ मध्ये त्यांनी ती जमीनीचे खरेदीखत मेसर्स सनशाईन होम्स बिल्डरसोबत नोंदणीकृत केले. त्या जागेच्या सातबाऱ्यावर सनशाईन होम्सचे नाव नोंदविण्यासाठी तलाठी कार्यालयात गेल्यानंतर दिलीप वोरा यांनी त्यावर हरकत घेत त्यांनी त्या जमिनीचे दस्तावेज शांती कन्ट्रक्शनच्या नावे नोंदणीकृत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयात वाद सुरु असुन न्यायालयाने त्या जमिनीवर कोर्ट रिसीव्हर नेमल्याचे जमीन मालकांना सांगितले.
यामुळे नवीन खरेदीखतानुसार त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर सनशाईन होम्सचे नाव नोंद करण्यास तलाठी कार्यालयाने नकार दिला. जागा मालकांनी त्याची चौकशी केली असता शांती कन्ट्रक्शनच्या भागीदारांमध्ये वाद निर्माण झाल्याने त्यांनी कंपनीच्या मालमत्तेप्रकरणी उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याचे समोर आले. त्यात मौजे घोडबंदर गाव येथील ७ हजार ५४० चौ. मी. जागेच्या सातबाऱ्यावर जमीन मालकांचे नाव असताना तसेच या जमिनीचा शांती कन्स्ट्रक्शनसोबत झालेला व्यवहार रहद झालेला असतानाही वोरा यांनी उच्च न्यायालयाची दिशाभुल करुन कोर्ट रिसीव्हर नेमल्याचे दिसून आले. यानंतर २०२५ मध्ये वोरा यांनी ठाणे रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदीखत तयार करून जागेच्या सातबाऱ्यात नमूद असलेल्या व्यक्तींची पावर ऑफ ऍटर्नी जोडल्याचे समोर आले. मात्र या पॉवर ऑफ अटर्नीवर जागा मालकांनी कोणत्याही सह्या केल्या नसतानाही तसेच पॉवर ऑफ अटर्नीमधील हिराबाई दादु पाटील, चंद्रकांत दादु पाटील, कस्तुरी चंद्रकांत पाटील, भरत चंद्रकांत पाटील हे चारही जमीन मालक मयत झाले असतानाही त्यांना ह्यात दाखवून वोरा यांनी बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी तयार केल्याचे उघड झाले.
अद्याप कोणालाही अटक नाही
याच बनावट पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारे जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांचे नाव चढविण्यासाठी घोडबंदर येथील तलाठी कार्यालयाला अर्ज दिल्याने तलाठी कार्यालयाने जमिनीच्या मालकांना नोटीस पाठविली. त्यावेळी वोरा यांनी बनावट पॉवर ऑफ अटर्नीनचा वापर करून नोंदणीकृत खरेदीखत केल्याचे उजेडात आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जमीन मालक रंजन पाटील यांनी काशीगाव पोलीस ठाण्यात वोरा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी चौकशी सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.