तिसर्‍या उड्डाणपुलाला नोव्हेंबरचा मुहूर्त ? 25 टक्के काम प्रलंबित pudhari photo
ठाणे

Bhayandar flyover project : तिसर्‍या उड्डाणपुलाला नोव्हेंबरचा मुहूर्त ? 25 टक्के काम प्रलंबित

खड्ड्यांमुळे वाहनचालक उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

भाईंदर पूर्वेकडील शिवार गार्डन जुना पेट्रोल पंप ते गोल्डन नेस्ट दरम्यानचा तिसरा उड्डाणपूल येत्या नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या उड्डाणपुलाचे 25 टक्के काम प्रलंबित असल्याचा दावा एमएमआरडीएने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत केला आहे.

एमएमआरडीएकडून दहिसर ते भाईंदर दरम्यान मेट्रो प्रकल्प 9 राबविण्यात येत आहे. या मेट्रो मार्गाखालून नागपूरच्या धर्तीवर तीन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्यातील शिवार गार्डन ते सिल्वर पार्क व सिल्वर पार्क ते प्लेझंट पार्क दरम्यानचे उड्डाणपूल अनुक्रमे 27 ऑगस्ट 2024 व 8 मार्च 2025 रोजी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

यामुळे या मार्गावरील वाहतुकीला गती मिळाली असली तरी याच मार्गावरील शिवार गार्डन ते गोल्डन नेस्ट दरम्यानचा तिसरा उड्डाणपूल गेल्या 15 ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याचे बहुतांशी काम प्रलंबित राहिल्याने हा उड्डाणपूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. यामुळे पेट्रोल पंप येथे प्रचंड वाहतूक कोंडी उद्भवत असल्याने हा उड्डाणपूल लवकर खुला करण्याची मागणी वाहन- चालकांकडून होऊ लागली आहे. त्यातच उड्डाणपुलालगत असलेल्या दुतर्फा मार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे असल्याने येथील वाहतूक संथगतीने सुरू असते.

या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने अनेकदा मेट्रो ठेकेदार कंपनीकडे सतत पत्रव्यवहार केला असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी या खड्डेयुक्त रस्त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. त्यामुळे येथील तिसरा उड्डाणपूल तातडीने सुरू होण्याची आस वाहनचालकांना लागून राहिली आहे.

आणखी अडीच महिन्यांची प्रतीक्षा

मुख्यमंत्र्यांनी अगोदरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यास तीन महिन्यांचा विलंब झाला असल्याने आता तो वेळेत वाहतुकीसाठी खुला करण्याकरीता ठेकेदाराला ठोस सूचना करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले. यावरून तूर्तास हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी आणखी अडीच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा

शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आ. नरेंद्र मेहता यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांच्या दालनात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. त्यावेळी एमएमआरडीएने हा उड्डाणपूल येत्या नोव्हेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT