भाईंदरमध्ये नशेबाजाकडून विद्यार्थिनींना मारहाण File Photo
ठाणे

Drug addict assaults students : भाईंदरमध्ये नशेबाजाकडून विद्यार्थिनींना मारहाण

नवघर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एका खाजगी ट्युशन क्लासमधील तीन विद्यार्थिनींनी एका अंमली पदार्थ नशेबाज तरुणाला प्रवेशद्वारावरून हटकल्याने त्या नशेबाज तरुणाने त्या विद्यार्थिनींवर हल्ला करीत त्यांना मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी पोलिसांनी त्या नशेबाजावर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यातील हल्लेखोर नशेबाजाचे नाव सोहेल शेडगे (23) रा. बंदरवाडी, भाईंदर पूर्व असे असून यापूर्वी देखील त्याने अशा मारहाणीचे प्रकार केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. मिरा-भाईंदर शहरात ड्रग नशेडींसह माफियांचा सुळसुळाट झाला असताना अनेकदा त्यात पोलिसांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यामुळे शहरात ड्रगचा गोरखधंदा बिनदिक्कतपणे सुरु असल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात आहे.

ज्या परिसरात शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस आहेत, अशा ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सर्रास केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यात विद्यार्थ्यांसह तरुण, तरुणी व वृद्ध मोठ्याप्रमाणात व्यसनाधीन होऊ लागल्याचे पहायला मिळते. अशा ड्रग माफियांसह ड्रगचे सेवन करणार्‍यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्यानेच त्यांच्याकडून लोकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी एका नगरसेवकाने नशेडी तरुणांना इमारतीच्या प्रवेशद्वारापासून हटकल्याने त्या नशेडयांनी त्याचा राग मनात धरून त्यांनी त्या नगरसेवकाचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता.

महिला, तरुणी, विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात

भाईंदर परिसरात अंमली पदार्थ सेवन करणार्‍यांसह त्याची विक्री करणार्‍यांचे प्रमाण मोठे असून त्यांच्यावर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्यानेच त्यांची मुजोरी वाढू लागल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी त्या विद्यार्थिनींच्या पालकांनी नशेबाज सोहेलवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा नशेबाज तरुण तेथील माजी नगरसेविकेचा नातेवाईक असल्याने सोहेलवर गुन्हा दाखल करू दिला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. परिणामी पोलिसांनी सोहेलविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याला समाज देत सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून या परिसरातील नशेबाजांकडून महिला तरुणी व विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT