शहापूर-किन्हवली-मुरबाड मार्गावरील सापगाव जवळील भातसा नदीवरील पुलाचा खालील भाग कोसळत असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत असलेल्या शहापूर - मुरबाड महामार्गावरील सापगाव जवळील भातसा नदीवरील पूल जीर्ण झाल्याची सूचना देत आहे. या पुलाचा खालील भाग कोसळत चालला असून त्याचे स्टील बाहेर आले आहे.
या रस्त्यावरून प्रवाशी वाहतुकीसह जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे या पुलावर मोठी विपरीत घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून या पुलावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा सावित्री पुलासारखा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही सुरू झाल्याने शहापुरातून समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने येथून ये-जा करणार्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे. या 3 किलोमीटर अंतरात असलेला भातसा नदीवरील पूल कुमकुवत होत चालल्याची सूचना देत आहे.
याच मार्गावरून कर्जत, मुरबाड, अहमदनगर, जेएनपीटी येथे जाण्यास अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच शहापूर तालुक्याची 70 टक्के जनता याच मार्गाने प्रवास करत असते. दरम्यान समृद्धीची शहापूर एक्झिट असलेला खूटघर-दोर्याचा पाडा येथून शहापूरकडे येणारा सिमेंटचा रस्ता जागोजागी अपुरा ठेवण्यात आला आहे. तर पावसाळ्यात अनेकदा या नदीवरील पूल भातसा धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर पाण्याखाली जात असल्याने शहापूरशी संपर्क तुटत असतो. याच रस्त्यावर शहापूरकडे येत असताना कांबारे पॉवर हाऊसजवळ असलेल्या आवरी-घोरपडी नदीवरील पूलही असाच धोकादायक असून पावसाळ्यात यावरही पाणी असल्याने अनेक वेळा वाहतूक बंद होत असते.
विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते मुरबाड या राज्य मार्गाचे भारत सरकारने दर्जान्नत्ती करून तो राष्ट्रीय महामार्ग क्र.548 (अ) मुंबई-नाशिक महामार्गाला शहापूर येथे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला खुटघर येथे, कल्याण औरंगाबाद निर्मळ रस्त्यास मुरबाड येथे, मुंबई-पुणे महामार्गाला खोपोली येथे तर मुंबई-गोवा महामार्गाला वाकण येथे जोडला जातो. असा
हा अतिमहत्वाचा महामार्ग आहे. या महामार्गाचे काम 2019 जानेवारीपासून आजतागायत सुरू आहे. तथापि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने समृद्धी महामार्गावरून मुंबईपासून पहिली एक्झिट असलेल्या शहापूरच्या या रस्त्यावर अर्धवट अवस्थेत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम करून सापगाव जवळील भातसा व आवरी - घोरपडी नदीवरील पुलावर तसेच भातसा नदी पुलाचा खालील काँक्रेट ढासळत असून यावर सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
सापगांव येथील भातसा नदीवरील पुलाचा खालील भाग कोसळत चालला आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने त्या पुलाचे संरक्षक कठडे देखील वाहून गेले आहेत. रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाकडे जाणार्या या पुलावर तातडीने संरक्षित उपायोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा महाड येथील सावित्री नदीवरील अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रविंद्र मडके, सदस्य जीवरक्षक टीम