आसनगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर 25 ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असल्याने गणेश भक्तांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणार्या गणेश भक्तांची संख्या कमी दिसून येत आहे. याशिवाय तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.
25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता धरणाची पाणीपातळी 140.70 मीटर इतकी झाली. सतत कोसळणार्या पावसामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरण प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 02.15 वाजता धरणाचे पाचही वक्रदरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले असून, यामुळे अंदाजे 254.05 क्यूमेक्स (9 हजार 717 क्यूसेक) इतका विसर्ग भातसा नदीत सोडण्यात आला आहे.
यामुळे शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.