किन्हवली : संतोष दवणे
मुंबईकरांची तहान भागवणार्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी 1.25 मीटरने खुले करण्यात आले असून सुमारे 16 हजार 820 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भातसा नदीची पाणीपातळी वाढली असून सापगाव पूल व परिसराला सावधानतेचा इशारा दिला आहे.
1 जूनपासून भातसा धरणक्षेत्रात 1765 मिमी पाऊस पडला, तर शनिवारी दिवसभरात 23 मिमी पाऊस पडला. त्यामुळे भातसा जलाशयाची पाणीपातळी 138.78 मीटरपर्यंत पोहोचली. सध्या भातसामध्ये 853.49 क्युबेक्स मीटर म्हणजेच 90.59 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी व्यवस्थापनासाठी भातसा धरणाचे पाचही दरवाजे प्रथम एक मीटरने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला होता.
शनिवारी साडेबारा वाजेपासून आणखी 0.25 मीटरने दरवाजे उघडण्यात आले. यामुळे भातसा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढला असून पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी सावध राहावे यासाठी पाटबंधारे विभागाने नदीकिनार्यावरील सापगाव परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. 1 जूनपासून भातसा धरणक्षेत्रात 1765 मिमी पाऊस पडल्याची माहिती भातसा धरण कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.