डोळखांब : मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील सर्वात मोठे भातसा धरण कधीही ओसंडून वाहू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भातसा धरण हे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात मोठे धरण आहे. धरणक्षेत्रात आतापर्यंत 1532.00 मिमी इतका पाऊस पडला आहे. यामुळे धरण 84 टक्के भरले असून लवकरच ओसंडून वहाणार आहे. धरणाची एकूण पाणीपातळी 142 मीटर इतकी असून आतापर्यंत 136.10 मीटर पाणीसाठा झाला आहे.
अवघी सहा मीटर इतकी पाणीपातळी शिल्लक आहे. सध्या सांडवा व विद्युत विसर्ग सुरू केलेला नाही. त्यामुळे धरण लवकरच म्हणजे तीन ते चार दिवसांत भरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.