शहापूर : समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल तर सावधान ! तुमच्या भरधाव वेगात असलेल्या वाहनास कधीही ब्रेक लावण्याची आपत्ती तुमच्यावर ओढवू शकते.
समृद्धी महामार्गावर फेज 16 दरम्यान म्हणजे शहापूर तालुक्यातील शेलवली, खुटाडी, मेंगाळपाडा, बिरवाडी, वाशाळा दरम्यान भटके श्वान व बेवारस मोकाट पाळीव जनावरे महामार्गावर फिरत असतात. यामुळे भरधाव असणार्या वाहन चालकांचा गाडीचा वेग नियंत्रित न झाल्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना शक्यतो वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा अखेरचा टप्पा पूर्ण होणे बाकी आहे. या अखेरच्या टप्प्यात 16 पूल आहेत. तर यामध्ये 5 बोगद्यांचा देखील समावेश झालेला आहे. दरम्यान इगतपुरी ते आमनेपर्यंत समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या महामार्गावरून अजूनपर्यंत अधिकृत वाहतूक सुरू झाली नसली तरी बहुतांश वाहन चालक या मार्गाचा वापर करतांना दिसत आहेत.
परिणामी इगतपुरी ते आमने दरम्यान काही ठिकाणी संरक्षक भिंतींचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने त्या ठिकाणाहून पाळीव जनावरे व भटके श्वान यांचा वावर होत असून ते रस्त्याच्या मध्यभागी बसलेले असतात. त्यामुळे वाहन चालकांनी महामार्गावरून प्रवास करताना सतर्क राहून वाहन चालवल्यास मोठा अनर्थ टळला जाऊ शकतो.