कल्याण : दरवर्षी जुलै महिना अखेरीस दुथडी भरून वाहणारे बारवी धरण ऑगस्ट महिना आला तरी भरले नसल्याने कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना अजून बारवी धरण भरण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण- डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, इत्यादी महापालिकामधील नागरी व औद्योगिक क्षेत्रामध्ये बारवी धरणाअंतर्गत पाण्याची गरज भागविली जाते. या शहरांतील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता धरण पूर्ण भरणे आवश्यक आहे. नाहीतर उन्हाळ्यामध्ये पाणी कपात करणे अनिवार्य होते.
25 जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे बारवी धरण कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू शकते, अशी अपेक्षा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रशासनाला होती व त्याप्रमाणे बारवी नदी काठाच्या नागरिकांना प्रशासनाने सावधगिरीचा इशारा देखील दिला होता; परंतु आजमीतीस बारवी धरण 95% भरला असून अजून नागरिकांना धरण भरून वाहण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
30 जुलै रोजी धरणात 91.58% 1 ऑगस्ट रोजी 93.96% तर सोमवारी 4 ऑगस्ट रोजी 95.25% इतका पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी साठ्यात तितकीशी वाढ झालेली नाही आणि आता पावसाचा जोर वाढण्याची काही चिन्हे नसल्याने नागरिकांना धरण भरण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.