ठाणे

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीची १ मे रोजी मुंबईत वज्रमुठ सभा होत असून मुंबईसह ठाण्यातही मोठे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मोठ्या फोटोसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघ आणि ठाणे, घोडबंदर रोड, मुंब्रा, कळवा, दिव्यामध्ये बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे वज्रमुट सभेला येण्याचे ठाणेकरांना आवाहन केले असून यातून आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे ह्याप्रमाणे ठाणे हे सत्ताकेंद्र बनले असून राज्याची सर्व सूत्रे ठाण्यातून हालतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपच्या मदतीने सत्ता हाती घेतल्यापासून ठाण्याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. तेव्हापासून ठाण्यातील राजकीय घडामोडींकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे. पाचही आमदार हे शिंदे यांच्यासोबत असल्याने ठाणे जिल्हा हा शिंदे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. ठाकरे गट कमजोर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान त्यांच्यापुढे उभे आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक आणि कुरघोडी हे चर्चेचा विषय बनले आहे. त्यापूर्वी शिंदे – आव्हाड हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी हे दोन्ही नेते एकमेकांच्या मतदार संघात फारशी ढवळाढवळ करताना दिसत नव्हते. आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदार संघात शिरकाव करत पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याने वादाला तोंड फुटले आहे. दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जात असताना जितेंद्र आव्हाड यांनीही वज्रमुठ सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघात बॅनरबाजी करीत पक्षाला बळ देण्याचे प्रयन्त सुरु केले आहेत.

राज्यभर शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभा होत असून येत्या १ मे रोजी मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुल येथे वज्रमुठ सभा होणार आहे. पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही सभा महत्वाची मानली जात आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघ, ओवळा माजिवडा, ठाणे, मुंब्रा कळवा या विधानसभा मतदार संघांमध्ये बॅनर लावले आहेत. त्यात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो झलकत असल्याने आता मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पक्ष वाढीसाठी आव्हाड यांनी सुरवात केल्याची चर्चा रंगली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT