नेवाळी : शुभम साळुंके
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरातील चाळींमध्ये अवैधरित्या प्रवेश केलेल्या बांगलादेशींचे वास्तव्य वाढत असल्याचे समोर आले असून येथील तीन बांग्लादेशींना हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नुकतीच उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी काही चाळींमध्ये सर्च मोहीम हाती घेतली असता तीन बांगलादेशी महिलांचे वास्तव आढळून आले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला परिसर बांगलादेशींच्या वास्तव्याने चर्चेला आला आहे.
चाळींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची नोंद शासन दरबारी नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना या परिसरात आरोपी शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या परिसरातील डोंगराळ भागासह माळरानांवर झालेल्या चाळींमध्ये सातत्याने बांगलादेशींचे वास्तव्य सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निदर्शनास आले आहे. नुकतीच हिललाईन पोलिसांनी नेवाळीतील काही चाळींमध्ये सर्च मोहीम हाती घेतली असता त्यांना तीन बांगलादेशीं महिलांचे वास्तव्य आढळून येताच त्यांना बेड्या ठोकून मायदेशी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशातील सीमेवरील सध्याचे वातावरण पाहता चिंतेची बाब आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीतील अतिसंवेदनशील परिसरातील भाभा अणू संशोधन केंद्रापासून हाकेच्या अंतरावर नेवाळी परिसरातून अवैध रित्या वास्तव्यास असलेले ३ बांगलादेशी नागरिक आढळून आले ही राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंतेची बाब आहे.ओमकार पावशे, सामाजिक कार्यकर्ते
मागील वर्षी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या पथकाने नेवाळीमधून अवैध वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी अभिनेत्रीला अटक करण्यात आली होती. हिललाईन पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघींना मायदेशी पाठविण्यात आले आहे. हिललाईन पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक कैलास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नेवाळी व द्वारली परिसरात शोध मोहीम हाती घेत ही कारवाई केली.