डोंबिवली : बजरंग वाळुंज
जम्मू-काश्मीरच्या पहलगान येथील बेसरन पठारावर मंगळवारी २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ पर्यटक मृत्युमुखी पडले. यात संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघा डोंबिवलीकरांचा समावेश आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीकर पोलिसांनी पाकिस्तानी व बांग्लादेशींयांना हुडकून काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे. कल्याण-डोंबिवलीत एकही पाकिस्तानी नागरिक आढळून आला नसला तरी या शोध मोहिमेदरम्यान चोरी-छुपे राहणाऱ्या बांग्लादेशी ६ घुसखोरांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशांन्वये परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यात चोरी-छुपे राहणाऱ्या बांग्लादेशीयांना हुडकून काढण्यासाठी सोमवारी दिवसभर शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी खासगी गुप्तहेरांचीही मदत घेण्यात आली होती. गोपनीय माहितीद्वारे कल्याण व डोबिवलीतील संशयीतांना पोलिस ठाण्यांत आणून त्यांच्याकडील आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली. संशयीत इसमांकडील कागदपत्रांची तपासणी केली असता ६ जण बांग्लादेशी असल्याचे आढळून आले. हे ६ बांग्लादेशी अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरूध्द पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३, ४ विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १३, १४ (अ) (ब) अन्वये गुन्हे नोंदवून कारवाई केली. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात १, खडकपाडा पोलिस ठाण्यात १, बाजारपेठ पोलिस ठाण्यात १ व डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात १ मध्ये असे एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आले आहेत.
गुंडांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे कल्याण-डोंबिवली परिमंडळ ३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अंमली पदार्थांचे रॅकेट चालविणाऱ्या बदमाशांसह चोर, गुंड, मवाल्यांची पळता भुई थोडी करून टाकली आहे. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी डीसीपी झेंडे यांना पाठबळ मिळाले असल्याने गुन्हेगारी जवळपास हद्दपार झाल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापाठोपाठ डीसीपी अतुल झेंडे यांनी बांग्लादेशी घुसखोरांवर देखिल कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पारपत्र आणि परवानगीविना सरहद्दीवरून भारतात प्रवेश करून कल्याण-डोंबिवलीत चोरी-छुपे वास्तव्य करणाऱ्या एकूण ३८ बांग्लादेशी घुसखोरांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तब्बल १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई आजपर्यंत जानेवारी २०२५ पासून करण्यात आली आहे. या पुढेही कल्याण-डोबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे सांगितले.