उल्हासनगर : उल्हासनगर येथे बागेश्वर धाम येथील धार्मिक विधी आणि होम-हवनमध्ये दान करण्याच्या नावाखाली 70 वर्षीय सेवानिवृत्त महिलेची 24 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर येथील साई मेहरवान पॅलेसमध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध शकुंतला बुलचंद अहुजा या फिर्यादी महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी करिश्मा, साहिल, गोली, उषा आणि तिची मुले तसेच 'गुरुजी' नावाच्या एका व्यक्तीसह एकूण आठ जणांनी संगनमत करून फसवणुकीचा कट रचला. जानेवारी 2023 ते 11 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ही घटना घडली. सुरुवातीला आरोपी करिश्मा हिने फिर्यादीकडून रुम घेण्याच्या नावाखाली 10 लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर, हे पैसे परत मिळवून देण्याच्या आणि फिर्यादीच्या घरातील 'विध्न' दूर करण्याच्या बहाण्याने आरोपींनी 'बागेश्वर धाम' येथील बाबाच्या पूजेसाठी व होम-हवनमध्ये दानधर्म केल्यास सर्व समस्या सुटतील, असा विश्वास फिर्यादीला दिला.
धार्मिक विधींचा आधार घेत आरोपींनी कलश आणि होम विधीमध्ये सोने टाकण्याची मागणी केली. यातून त्यांनी वेळोवेळी फिर्यादीकडून 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 10 ग्रॅम वजनाचे हिरे आणि रोख रक्कम असे एकूण सुमारे रु. 24 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला. या फसवणुकीचा कळस 11 नोव्हेंबर 2025 रोजी गाठला गेला. त्या दिवशी आरोपींनी फिर्यादीस 'बागेश्वर धाम बाबाचा प्रसाद' म्हणून एक मिठाई खाण्यास दिली. या मिठाईत गुंगीकारक औषध टाकून फिर्यादीस बेशुद्ध करण्यात आले आणि बेशुद्धावस्थेचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडीही काढून घेण्यात आली.
फसवणुकीची ही बाब लक्षात आल्यानंतर शकुंतला अहुजा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी.आर.दराडे हे करीत आहेत.