अंबरनाथ : मैदानी खेळांचा अभाव, मैदानांची कमतरता, स्पर्धेच्या जगात स्वत:ला पुढे ठेवण्याचा ताण, त्यात रोजचे धावपळीचे जीवन, मोबाईलमुळे एकमेकांशी न होणार संवाद, त्यातून येणारा मानसिक एकटेपणा आणि या सगळाचा परिणाम कदाचित डिप्रेशन! आजच्या काळात शहर आणि निमशहरी भागात ही समस्यातरुणांसह बालकांपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे. या समस्येवर सामाजिक संस्था आणि शासकीय स्तरावर उपाययोजना चालू आहेतच मात्र या सहज व छोट्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणारा एक अवलिया बदलापुरात जेष्ठ नागरिक व युवकांना रोजच्या मानसिक तणावापासून काही वेळ दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचे नाव आहे बाळासाहेब शिंदे.
बाळासाहेब शिंदे हे शासनाच्या कामगार कल्याण विभागातील कर्मचारी. आठ वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी पाहिले की संध्याकाळी फिरायला बाहेर पडणारे तरुण तरुणी मोबाईल आणि इतर नशेच्या आहारी गेली आहेत. रस्त्यावर ते तासनतास फिरत असतात वा एका ठिकाणी बसून फक्त मोबाईल खेळत राहतात. एका क्षणी बाळासाहेब शिंदे यांना निवृत्तीनंतर काय करायचं या प्रश्नाचं उत्तर सापडलं. त्यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला, कुणालाही अडथळा होणार नाही, अशा जागेत आठ वर्षापूर्वी त्यांनी एक लहानसा परोपकारी व्यवसाय सुरू केला.
रस्त्यावरील व्यवसायाच्या शेजारी जेष्ठ नागरिक कट्टा सुरू केला. बसण्यासाठी खुर्च्या व वाचनासाठी पाच वृत्तपत्रे त्याठिकाणी ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली. तर युवकांसाठी तीन उत्तम प्रतीचे कॅरम बोर्ड मांडले. आणि बघताबघता फुलांवर भुंगे यावेत तशी तरुण तरुणी मोबाईल बाजूला ठेऊन कॅरम खेळायला येऊ लागली. तर जेष्ठ नागरिक देखील वृत्तपत्रे वाचून एकमेकांशी चर्चा करू लागले. काही दिवसातच झालेला हा बदल बाळासाहेब शिंदे यांना समाधान देऊन गेला.
मागील सहा वर्षा पासून बदलापूर पूर्वेतील कात्रप रस्त्यावर बाळासाहेब शिंदे यांचा हा उपक्रम सुरू आहे. इतकेच नाही तर लवकरच त्यांना या ठिकाणी एक छोटेखानी लायब्ररी सुरू करायची आहे. विशेष म्हणजे या सगळ्या उपक्रमासाठी ते स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करतात. आपल्या व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपताना बाळासाहेब शिंदे युवकांसाठी मामा म्हणून ओळखले जातात.
तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र आणि वाचनालय सुरु करुन एकटे धावाधाव करत असतात, रात्री उशीरापर्यंत वेळ संपल्यावर लावलेले कॅरम, कॅरम स्टॅड, पेपर स्टॉल, खुर्च्या इत्यादी सामान उचलण्यापासून दुस-या दिवशी पुन्हा नीट लावण्यापर्यंतची सारे कामे ते स्वत: करतात. त्याना मदत करु पाहणा-या तरुणांना ते मनाई करतात. याचं कारण ते सांगतात मी काम करत राहिलो तर माझं आरोग्य नीट राहिल. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे बाळासाहेब शिंदे हे सर्व निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी आदर्श आहेत.