AI image 
ठाणे

Badlapur News : जनगणनेचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांसह पाणीपुरवठा विभागाच्या ५ जणांवर बदलापुरात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : जनगणनेच्या राष्ट्रीय कामात कमालीची हलगर्जी दाखवणे आणि प्रशासनाचे लेखी आदेश देऊनही कर्तव्यावर हजर न राहणे बदलापुरातील पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. वारंवार संपर्क साधून आणि रीतसर नोटीस बजावूनही जनगणनेचे काम नाकारल्यामुळे कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या जनगणना विभागाचे मुख्य पर्यवेक्षक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या आदेशानुसार या पाचही कर्मचाऱ्यांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय कर्तव्याला केराची टोपली दाखवणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल झाल्यामुळे बदलापूर परिसरात आणि सरकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

भारताची सन २०२७ ची अधिकृत जनगणना प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्या संदर्भातील पूर्वतयारी म्हणून कुळगाव-बदलापूर नगरपालिका हद्दीतील विविध शाळा, शासकीय कार्यालये आणि निमशासकीय आस्थापनांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांची जनगणनेच्या कामासाठी विशेष नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना नगरपालिकेकडून आवश्यक ते प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन 'घर गणती' करण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, नगर परिषदेने आदेश देऊनही काही कर्मचारी आणि शिक्षक अद्यापपर्यंत आपल्या नियुक्त कर्तव्यावर हजर झाले नसल्याचे समोर आले.

या राष्ट्रीय मोहिमेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घरगणतीसाठी नेमलेल्या तीन वेगवेगळ्या भागांतील पर्यवेक्षकांच्या अधिकृत फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एम.जी.पी. ऑफिस, बदलापूर) व्ही. एस. सांबळे आणि बी. जी. जाधव या दोन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर उर्वरित तीन आरोपींमध्ये बदलापुरातील नामांकित खासगी शाळांमधील शिक्षिका असून, त्यात हेवन बेल कॉन्व्हेंट स्कूलच्या दिपावली सविओ दामोदरे, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या अर्चना दिनेश मराडे आणि शिरगाव येथील एस.डी.एम. हायस्कूलच्या पूजा चेतन चव्हाण यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

जनगणना हे सर्वोच्च राष्ट्रीय कर्तव्य असूनही या कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या जनगणना विभागाचे मुख्य पर्यवेक्षक मारुती गायकवाड यांचे आदेश थेट धुडकावून लावले होते. या कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला होता, तसेच लेखी आदेशही बजावण्यात आले होते. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कामावर न येण्याचा हेकेखोरपणा या कर्मचाऱ्यांनी दाखवला. या कारवाईनंतर जनगणनेच्या कामात हयगय करणाऱ्या आणि आपली ड्युटी रद्द करून घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात वेगवेगळ्या सबबी सांगत चकरा मारणाऱ्या इतर शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. जनगणना हे देशाचे अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर आणि राष्ट्रीय कर्तव्य असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यापुढील काळातही जे कर्मचारी जनगणनेच्या कामात कामचुकारपणा करतील किंवा प्रशासकीय आदेशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर यापेक्षाही अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही मुख्याधिकारी गायकवाड यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT